Monday, December 23, 2024

/

शहापूर दगडफेकी प्रकरणी दोन गुन्हे; 10 जणांना अटक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अळवण गल्ली येथील हाणामारी व दगडफेकी प्रकरणी एकूण दोन गुन्हे (एफआयआर) नोंदवण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात सहभागी अन्य लोकांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली आहे.

शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अळवण गल्ली येथे क्रिकेटच्या खेळादरम्यान लहान मुलांमधील भांडणाचे पर्यवसान हाणामारी आणि दगडफेकीच्या घटनेत झाले. परिणामी तणाव निर्माण होऊन लहान मुलांच्या आई-वडिलांची गोची झाली.

सदर घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याच्या आमच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती हाताळली आणि परिस्थिती पूर्वपदावर आली. या संदर्भात एकूण 2 एफआयआर नोंदवण्यात आले असून 10 जणांना अटक करण्यात आली आहे. उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची आम्ही पडताळणी करत आहोत आणि प्रकरणात सहभागी असलेल्या इतरांचीही ओळख पटवली जात आहे.

एकंदर शहरातील परिस्थिती सामान्य आहे, अशी माहिती देऊन सोशल मीडियावर शांतता भंग करणाऱ्या अफवा पसरवू नये अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिला आहे.

क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये झालेल्या वादावादीतून दोन गटात तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अळवण गल्ली, शहापूर येथे घडली होती. या प्रकारामुळे शहापूर परिसरात विशेष करून अळवण गल्ली, जेड गल्ली, पी.के. कॉटर्स आणि कोरे गल्ली परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मात्र तोपर्यंत दोन्ही गटातील तीन अल्पवयीन मुलांसह एकूण 8 जण जखमी झाले होतै. त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

सदर घटनेनंतर परिसरात पुन्हा अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर नागरिकांनी शहापूर पोलीस स्थानकासमोर रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. दरम्यान आळवण गल्ली येथील कालच्या घटनेमुळे शांत असलेल्या बेळगावचे वातावरण पुन्हा बिघडत आहे का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.