बेळगाव लाईव्ह : केपीसीसी अध्यक्षपदाचा निर्णय हा सर्वस्वी पक्षाच्या वरिष्ठांकडे राखीव असतो. शिवाय केपीसीसी अध्यक्षपदाच्या शर्यतीत मी नाही अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्षपद रिक्त झाल्याशिवाय या पदाचा विचार करता येणार नाही.ज्यांना राज्याबद्दल माहिती आहे, जे राज्यभर फिरले आहेत, आणि जे या पदासाठी जे सक्षम आहेत त्यांना हे पद देण्यात यावे.
दरम्यान, कर्नाटकातून पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कोणीही नसल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत बोलताना ते म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे हे एआयसीसीचे अध्यक्ष आहेत.
आपल्याकडेही पंतप्रधान होण्याची क्षमता असलेले अनेक लोक आहेत. इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा मला विश्वास असून यातील अधिकाधिक जागा पक्षाला मिळाल्यास आम्ही पंतप्रधानपदावर दावा करू, असे त्यांनी स्पष्ट केले.