बेळगाव लाईव्ह : १८ वर्षानंतर पूर्व भागातील सांबरा या गावची श्री महालक्ष्मी यात्रा येत्या १४ मे पासून सुरु होणार असून या पार्श्वभूमीवर आज अंकी घालण्याचा (घटस्थापना) कार्यक्रम पार पडला. देवस्थान कमिटी, पंच, हक्कदार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात महालक्ष्मी यात्रेसंदर्भात अधिक माहिती देण्यात आली.
मंगळवार दि. १४ मे पासून सांबरा महालक्ष्मी यात्रेची सुरुवात होणार होणार आहे. याचदिवशी पहाटे देवीचा विवाहसोहळा पार पडणार असून मंगळवार दि. १४ मे ते शुक्रवार दि. १७ मे पर्यंत पारंपरिक रथोत्सव पार पडणार आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत देवीचा व्हन्नाट होणार आहे, त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी देवी गदगेवार विराजमान होईल.
या रथोत्सवातही भाविक ओटी भरू शकतात. तसेच शुक्रवार दि. १७ मे ते २२ मे यादरम्यान गदगेवर विराजमान झालेल्या देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी दिली.
सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रोत्सवासाठी रथाचे सुशोभीकरण करण्यात आले असून हा रथ १९५० साली झालेल्या यात्रा कमिटीने तयार केलेला पारंपरिक रथ आहे. याच रथाचे सुशोभीकरण करण्यात आले असून तब्बल ६० फूट उंचीचा ९ आंखणी ४२ खांबांचा आणि ६ चाकांचा भव्य असा रथ सज्ज करण्यात आला आहे. या रथावरील ९ मजले गावातील प्रमुख गोष्टींना अनुसरून तयार करण्यात आले आहेत.
यापूर्वी १९५०, १९८६, २००६ अशा एकूण तीन महालक्ष्मी यात्रा पार पडल्या आहेत. २०२४ साली होणारी यात्रा हि १८ वर्षानंतर भरविण्यात येत असून यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, पाण्याची सोय करण्यात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ते, गटारी सह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नागेश देसाई यांनी दिली.
यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, हक्कदार, पंच कमिटी, युवक आणि महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.