Thursday, December 26, 2024

/

कारवार लोकसभेची रणधुमाळी.. कुणाच्या पारड्यात मतदारांचा कौल?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱ्या कारवार म्हणजेच उत्तर कन्नडा लोकसभा मतदार संघात निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात प्रचाराला जोरदार रंगत चढत आहे. सुमारे पावणेतीख लाख मराठा मतदारांची संख्या असणाऱ्या या मतदार संघात पहिल्यांदाच महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार उतरवला आहे.

एकीकडे काँग्रेसने मराठा उमेदवाराला दिलेली संधी, दुसरीकडे भाजपकडून सुरु असलेले शर्थीचे प्रयत्न आणि पहिल्यांदाच उमेदवारी देऊन निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेली महाराष्ट्र एकीकरण समिती या तीन उमेदवारांची लढत रोमांचक ठरणार आहे.

८ विधानसभा मतदार संघ असणाऱ्या या लोकसभा मतदार संघात काँग्रेसकडे ५ तालुक्यांचे आमदारपद आहे तर ४ तालुक्यात भाजपाची सत्ता आहे. यामध्ये भाजपचे खानापूर तालुक्यात विठ्ठलराव हलगेकर, कुमठ्यामध्ये दिनकर शेट्टी आणि यल्लापूरमध्ये शिवराम हेब्बार असे तीन आमदार आहेत. तर कित्तूरमध्ये बाबासाहेब पाटील, हल्याळमध्ये आर. व्ही. देशपांडे, कारवारमध्ये सतीश सैल, भटकळ मध्ये एम. एस. वैद्य, शिर्सीमध्ये भीमण्णा नाईक असे एकूण पाच आमदार काँग्रेसचे आहेत. यापैकी भाजपाकडे असणाऱ्या तीन विधानसभा मतदार संघातील यल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बार यांच्या मुलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आपल्या मुलाच्या पाठीशी छुप्या पद्धतीने पाठिंबा देणाऱ्या हेब्बारांमुळे भाजपाची शक्ती कमकुवत झाली आहे.

निवडणूक प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र प्रथमदर्शनी दिसत आहे. महिला आणि मराठा कार्डच्या आडून काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपाकडे या मतदार संघात राजकीयदृष्ट्या शक्ती अपुरी पडत असल्यामुळे थेट पंतप्रधानांनी जरी प्रचारात उडी घेतली असली तरी मतदारांनी भाजपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर प्रचार सभा पार पडली. मात्र या प्रचार सभेत हावेरी, शिमोगा, यल्लापूर यासारख्या भागातील बाहेरच्याच नागरिकांची गर्दी असल्याची चर्चा या मतदार संघात सुरु आहे. याचदरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून अधिकाधिक मराठा आणि मराठीभाषिकांच्या मतांवर निवडून येणाऱ्या पक्षाला म. ए. समितीने आव्हान दिल्याने भाजप आणि काँग्रेस यासोबतच समितीचीही कडवी टक्कर मिळणार आहे.Karwar

सीमाप्रश्नाच्या अंतिम टप्प्यात समितीने उत्तर कन्नडा लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केल्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खानापूर, कित्तूर या दोन तालुक्यातील मते आजवर निकालासाठी निर्णायक ठरत आली आहेत. यापैकी सरासरी उच्चांकी मतदान पाहता मराठी भाषिकांचा टक्काच अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाही गेलेलं येथील मराठी भाषिक पुन्हा समितीच्या मूळ प्रवाहात सामील होऊन समितीच्या पाठीशी खंबीर उभे राहतील, असा विश्वासही राजकीय सूत्रातून व्यक्त होत आहे.

कारवार लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीने पहिल्यांदाच उमेदवार दिला आहे. समितीला विजयाची खात्री नसली तरी खानापूर आणि मराठी भागात मराठी माणसांची मते अबाधित राखण्याची महत्त्वाची भूमिका बजावण्यात येणार आहे. तर अनेक दिवसांपासून कारवार परिसरात मराठी भाषकांची शक्ती कमी झाली होती त्या शक्तीला पुन्हा उभारणी मिळण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.