बेळगाव लाईव्ह :महापालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयाने तोडगा काढल्यामुळे ऑनलाइन मालमत्ता कर भरण्यात अडथळे येत असलेल्या रहिवाशांना आता सुटकेचा निःश्वास सोडता येणार आहे.
शहरातील निवासी संकुलातील सदनिकांच्या (फ्लॅट) घरपट्टीचे चलन आता विभागीय महसूल कार्यालयातून दिले जात असल्यामुळे ज्यांना सदनिकांच्या घरपट्टीचे चलन ऑनलाईन मिळत नाही त्यांना महापालिका कार्यालयात जाऊन ते मिळवण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
प्रक्रिया सुरळीत करण्याचे प्रयत्न करूनही, अनेक मालमत्ता कर चलनाचा ऑनलाइन पर्याय बंदच आहे. ज्यामुळे अनेक रहिवासी अडचणीत आले आहेत. मात्र, बेळगाव शहर महानगरपालिकेच्या विभागीय महसूल कार्यालयांनी रहिवासी संकुलातील सदनिकांसाठी प्रत्यक्ष चलनाची ऑफर देऊन मदतीचा हात पुढे केला आहे.
“मालमत्ता कर चलनाची ऑनलाइन अनुपलब्धता ही आमच्यासाठी मोठी गैरसोय झाली आहे. एका महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि आम्ही अद्याप ते मिळविण्यासाठी धडपडत आहोत,” अशी निराश प्रतिक्रिया एका रहिवाशाने दिली. सदनिकांच्या घरपट्टीची सुधारित माहिती संगणकीय प्रणालीत अपलोड झालेले नाही त्यामुळे चलन ऑनलाइन उपलब्ध नाही.
तथापि या समस्येचे निराकरण करण्यासाठी मालमत्ता मालक आता गोवावेस, कोनवाळ गल्ली, रिसालदार गल्ली आणि अशोकनगर येथील विभागीय महसूल कार्यालयांना भेट देऊ शकतात. तसेच तेथे आपला मालमत्ता ओळख (सीआयडी) क्रमांक देऊन आवश्यक चलन मिळवू शकतात.
ऑनलाइन पेमेंटमधील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, नगरविकास खात्याने 5 टक्के सवलत कालावधी वाढविण्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. राज्यातील बेळगाव, तुमकूर, दावणगेरे आणि हुबळी -धारवाडसह अनेक महापालिकांनी पाच टक्के सवलतीला मुदत वाढ मिळावी अशी लेखी मागणी नगर विकास खात्याकडे केली आहे केली आहे. “हा मालमत्ता कराचा मुद्दा बेळगाव महापालिकेसाठी वेगळा वाटतो.
आजच्या डिजिटल युगात अशी अकार्यक्षमता अस्तित्वात आहे हे निराशाजनक आहे,” असा शेरा संबंधित रहिवाशाने मारला आहे. मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत संपत असताना परिस्थिती सुधारण्यासाठी महानगरपालिकेकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.
महापालिका कर भरणा प्रणालीतील उणिवा दूर करण्यात अयशस्वी झाल्यामुळे करदात्यांची केवळ गैरसोय होत नाही तर त्यांचा प्रशासनावरील विश्वासही कमी होतो. सामान्य परिस्थितीत जुलैपासून केलेल्या मालमत्ता कराच्या देयकांवर 2 टक्के दंड आकारला जातो. तथापि, मालमत्ता मालक 30 जूनपूर्वी वेळेवर कराचे पैसे भरून दंड टाळू शकतात.