बेळगाव लाईव्ह :सध्याच्या तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर चाऱ्यासाठी जनावरांचे होणारे हाल लक्षात घेऊन शहरातील भाऊराव काकतकर (बी.के.) कॉलेजच्या एनसीसी छात्रांनी माजी वरिष्ठ एनसीसी अधिकारी स्वयं पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज शिवापुर (जि. बेळगाव) येथील श्री श्री मुप्पीन काड सिद्धेश्वर स्वामीजी मठ येथील गोशाळेला 10 पोती पशुखाद्याची मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.
बेळगाव जिल्ह्यातील शिवापूर येथे श्री श्री मुप्पीन काड सिद्धेश्वर स्वामीजी मठाच्या गोशाळेत 60 हून अधिक गायी आहेत. यावर्षी तीव्र उन्हाळ्यामुळे बेळगाव जिल्ह्यात जनावरांसाठी पाणी आणि अन्नाची टंचाई निर्माण झाली आहे.
जंगल प्रदेश कोरडे पडत असून बोअरवेल आणि विहिरीचे पाणीही खाली गेले आहे. याची दखल घेत बी. के. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 26 कर्नाटक बटालियनच्या 16 एनसीसी छात्रांनी आज गुरुवारी सकाळी श्री श्री मुप्पीन काड सिद्धेश्वर स्वामीजी मठाला भेट देऊन तेथील गोशाळेतील गायींसाठी पशुखाद्याची देणगी दिली.
मठातील गो-मातांना पशुखाद्य पुरवणाऱ्या या छात्रांमध्ये कुमकुम गंटेकर, इंद्रायणी गोजेकर, साक्षी गुरव, संध्या पाटील, सुष्मिता नाईक, रिया बेन्नाळकर, सानिया रेडेकर, श्रेया चौगुले, रुतुराज देसाई, अमोल पाटील, विशाल पाटील, समिट गुंडकल, बसवंत ओ. सी., बसवंत एस. आदींचा समावेश होता. या पद्धतीने एक प्रकारे देश सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल या छात्रांनी एनसीसी सीटीओ सूरज पाटील, बी.के. कॉलेजचे प्राचार्य आणि प्राध्यापकवर्गाचे आभार मानले आहेत.
गाईंना पशुखाद्य पुरवण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपरोक्त एनसीसी छात्रांना फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, मंदार के., ओम अणवेकर, प्रमोद, बबलू खरे, निरज शहा, बालेश शेखर हलगी व विजय होंडाड यांचे सहकार्य लाभले.