बेळगाव लाईव्ह :ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व वळीव पावसाने आज सायंकाळी लावलेल्या जोरदार हजेरीमुळे सदाशिवनगर येथील प्रभाग क्र. 25 मधील नाल्या शेजारी असलेल्या घरांमध्ये सांडपाणी आणि घाण केरकचरा शिरून नुकसान होण्याबरोबरच रहिवाशांची मोठी गैरसोय झाली.
आमदार राजू सेठ आणि स्थानिक नगरसेवक यांच्याकडे 6 महिन्यापूर्वी निवेदनाद्वारे मागणी करूनही नाल्याचे बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकार घडल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. प्रभाग क्र. 25 मधील नाला हा अरुंद असल्यामुळे आजच्या मुसळधार पावसामुळे तो तुडुंब भरून नेहरूनगर, अझमनगर, सदाशिवनगर वगैरे परिसरात या नाल्याचे पाणी घराघरांमध्ये शिरण्याबरोबरच रस्त्यावर आले होते.
आढोळ्याच्या वळीव पावसामुळे प्रभाग क्र. 25 येथे आज ही परिस्थिती निर्माण झाली तर भर पावसाळ्यात काय परिस्थिती होईल याची कल्पनाच न केलेली बरी, असे येथील रहिवाशांमध्ये बोलले जात आहे. तसेच येथील नाल्याचे युद्धपातळीवर बांधकाम केले जावे अशी जोरदार मागणी केली जात आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाच्या हजेरीमुळे नेहमीप्रमाणे ठिकठिकाणी गटारी तुंबून सांडपाणी केरकचरा रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली होती. सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. विकास कामे सुरू असलेल्या ठिकाणी तसेच गटारी, ड्रेनेज, जलवाहिन्या आदींसाठी खोदकाम केलेल्या जागी पाणी साचून चिखलाची दलदल निर्माण झाली होती.
एकंदर काही मोजका परिसर व रस्ते वगळता आजच्या या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र अस्वच्छता निर्माण होऊन महापालिकेच्या भोंगळ कारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले.