बेळगाव लाईव्ह : दरवर्षीप्रमाणे यंदाही बेळगावमध्ये भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने फळबागायत खात्यातर्फे आयोजित आंबा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सकाळी मोठ्या उत्साहात पार पडला.
फळबागायत खात्यातर्फे शहरातील क्लब रोडवरील ह्युम पार्क येथे शुक्रवार दि. १० मे पासून सोमवार १३ मे पर्यंत आंबा महोत्सव व बेदाणा मेळा आयोजित करण्यात आला आहे.
सदर आंबा महोत्सवाच्या आज सकाळी आयोजित केलेल्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बलिंग उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फीत कापून महोत्सवाचे उद्घाटन झाले.
याप्रसंगी स्थानिक नेतेमंडळींसह फळबागायात खात्याचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. ह्युम पार्क येथील आंबा महोत्सव येत्या रविवार पर्यंत दररोज सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत चालेल.
या महोत्सव अंतर्गत बेळगावचे स्थानिक आंबे तसेच प्रतिष्ठित ब्रँड नावाखाली विविध प्रकारच्या स्वादिष्ट आंब्यांचे स्थानिक शेतकऱ्यांकडून थेट प्रदर्शन घडविले जाणार आहे. बेळगावच्या आंब्याव्यतिरिक्त, रत्नागिरी आणि देवगड भागातील आंबे चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी या महोत्सवाद्वारे ग्राहकांना उपलब्ध करण्यात आली आहे आहे.
यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, सरकारचे कार्यदर्शी शर्मा इक्बाल, प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टण्णावर आदी उपस्थित होते.