बेळगाव लाईव्ह : मराठा समाज आणि मराठी भाषिकांच्या एकजुटीसाठी बेळगावमध्ये भव्य सभेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी आंदोलन उभं करण्यासाठी एकजूट महत्वाची असून याची सुरुवात कुटुंबापासून करण्याची गरज असल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनातून आदर्श घेत बेळगाव लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज सकाळपासून आपल्या कुटुंबासमवेत प्रचाराचा धुमधडाका सुरु केला. सकाळच्या सत्रात आपल्या कुटुंबासह गाठीभेटी तर सायंकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत रॅली बाईक पदयात्रा करत आहेत.
हिंडलगा, विजयनगर, सुळगा, उचगाव, गोजगे, कल्लेहोळ, बाची, कुद्रेमानी आदी ग्रामीण भाग पिंजून काढत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि पत्रकेही वाटली. या भागातून मराठी भाषिकांचा मिळालेला पाठिंबा उल्लेखनीय होता. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांसह हर हर महादेव हर घर महादेव या घोषणांनी महादेव पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यात आला.
केवळ प्रचारासाठी बेळगाव शहरातील विविध भाग पिंजून न काढता आपल्यासमवेत शिदोरी घेऊन फिरणाऱ्या महादेव पाटलांनी राष्ट्रीय पक्षांच्या घोडेबाजारालाही प्रत्त्युत्तर दिले आहे. एकीकडे पैसे, जेवण, दारू यासह अनेक गोष्टींची प्रलोभने देऊन राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार गर्दी जमवत आहेत.
मात्र दुसरीकडे सीमावासियांच्या स्वाभिमानाच्या लढाईत आपल्या कुटुंबासमवेत स्वतःसोबत घेऊन गेलेल्या शिदोरीचा, वनभोजनाचा आस्वाद घेत महादेव पाटील यांनी राष्ट्रीय पक्षांच्या विकाऊ राजकारणाच्या कानशिलात लगावली आहे.