बेळगाव लाईव्ह :लोकसभा निवडणुकीमध्ये तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग असला तरी यावेळी बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील तृतीयपंथीय मतदारांनी केलेल्या मतदानाची आकडेवारी पाहता त्यांच्या मतदानाचा टक्का घसरला आहे.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत तृतीयपंथीय समुदायाला फारसे स्वारस्य नसल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील या समुदायांमध्ये मतदारांनी केलेल्या मतदानावरून ते स्पष्ट झाले आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 95 तृतीयपंथीय मतदार आहेत. त्यापैकी या वेळच्या निवडणुकीत मंगळवारी झालेल्या मतदाना प्रसंगी केवळ 20 जणांनीच मतदानाचा हक्क बजावला आहे.
चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात 80 तृतीयपंथीय मतदार असले तरी त्यापैकी केवळ 35 जणांनी मतदान केले आहे. कित्तूर व खानापूर हे दोन विधानसभा मतदारसंघ कारवार लोकसभा मतदारसंघात येतात.
या दोन मतदार संघांपैकी खानापूर मतदार संघातील 5 तृतीयपंथीय मतदारांपैकी फक्त एकाने मतदानाचा हक्क बजावला असून कित्तूर मधील 6 पैकी दोघांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केले आहे.