बेळगाव लाईव्ह ;गोव्याहून कंटेनर मधून बेकायदेशीररित्या आंध्र प्रदेशला नेण्यात येत असलेला सुमारे 28 लाखाहून अधिक किमतीचा गोवा बनावटीचा दारू साठा काल शनिवारी सायंकाळी पोलिसांनी यमकनमर्डी जवळ जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे संतोष नारायण हलसे (वय 33, रा. आष्टा ता. चाकूर, जि. लातूर) आणि सदाशिव नागोबा गिरडे (वय 53, रा. केडनेसरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी आहेत.
पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील यमकनमर्डीनजीक वाहनांची तपासणी करताना एक कंटेनर (क्र. एमएच 46 एमएफ 4138) अडवून पोलिसांनी तपासणी केली असता कंटेनरमध्ये 16,848 लिटर गोवा बनावटीची दारू आढळून आली. सदर एकूण 1950 बॉक्स मध्ये असलेल्या या बेकायदेशीर दारू साठ्याची किंमत 28 लाख 8 हजार रुपये इतकी होते.
सदर दारू साठा गोव्याहून बेळगाव मार्गे आंध्र प्रदेशला नेण्यात येत होता. बेकायदा दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला सुमारे 10 लाख रुपये किमतीचा कंटेनरही पोलिसांनी जप्त केला आहे. या पद्धतीने सदर कारवाईत एकूण 38 लाख 8 हजार रुपये अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी काल शनिवारी रात्री दिली. लोकसभा निवडणूक आणि आंध्र प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे उद्या सोमवारी मतदान होणार आहे. त्याचप्रमाणे तेलंगणासह 10 राज्यांमधील 96 लोकसभा मतदारसंघात त्याच दिवशी मतदान होणार आहे.