बेळगाव लाईव्ह : बेळगावसह विविध ठिकाणी होणाऱ्या लक्ष्मी यात्रेच्या स्वरूपापेक्षा आपले वेगळेपण जपत हिंडलगा व्याप्तीत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिराचा ३२ वा वार्षिकोत्सव सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून देवीची पूजा-अर्चा, अभिषेक आणि विविध धार्मिक विधी आटोपल्यानंतर पारंपरिक वाद्यवादनाने नागराज जाधव यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. ढोल, ताशा, झांज आणि टाळाच्या गजरात संपूर्ण गावात पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
गेल्या ३२ वर्षांपासून सातत्याने श्री महालक्ष्मी देवस्थानाचा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.
या भागातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या देवस्थानात केवळ धार्मिक नव्हे तर राष्ट्रीय सण देखील मोठ्या उत्साहाने साजरे करण्यात येतात. इतर ठिकाणी होणाऱ्या लक्ष्मी यात्रेपेक्षा या यात्रेचे स्वरूप संपूर्णतः वेगळे आहे.
या यात्रोत्सवात मांसाहार वर्ज्य करून गोड जेवणाचा बेत आखला जातो. देवस्थानाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले जाते. सुमारे ३५०० हजार हुन अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
पालखी मिरवणुकीनंतर सत्यनारायण महापूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. तसेच देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रमही पार पडतो, अशी माहिती श्री महालक्ष्मी कल्चरल अँड सोशल युनियन चॅरिटेबल ट्रस्टचे कार्याध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर यांनी दिली.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ तसेच ग्राम पंचायत सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष दत्ताजीराव जाधव, उपाध्यक्ष कृष्णा बाडीवाले, कार्यवाह प्राजक्त केंकरे, खजिनदार सुरेश पाटील, सदस्य राजन टाकळकर, शिवाजी बाडीवाले, शंकर गर्डे, दिनकर गवस, किशोर उरणकर, श्रीकांत लोकरे, डॉ. सतीश दिवटे, सूर्यकांत गावडे, नामदेव रेडेकर, धीरज भाटे, नंदेश दळवी, जगदीश पाटील, सच्चीदानंद चिक्कोर्डे, रमेश रेडेकर आदींसह महिला मंडळाच्या पदाधिकारी, सदस्या आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.