बेळगाव लाईव्ह :खानापूर नूतन बस स्थानकावरील नामफलकावर फक्त कन्नड आणि इंग्रजीला प्राधान्य न देता त्यामध्ये तात्काळ मराठी भाषेचाही अंतर्भाव करावा. अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केली आहे तसेच मागणी पूर्ण न झाल्यास स्थानकाच्या उद्घाटनाप्रसंगी आंदोलन छेडण्याबरोबरच न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील असा इशारा देण्यात आला आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज बुधवारी सकाळी खानापूर बस स्थानक आगार व्यवस्थापकांना सादर केले. आगार व्यवस्थापकांनी निवेदनाचा स्वीकार करून आपल्या वरिष्ठांशी चर्चा करण्याद्वारे योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
खानापूरच्या नूतन बस स्थानकाचे येत्या जून महिन्यात होणार असल्याचे कळते. मात्र या बस स्थानकावरील सर्व माहिती व नामफलक फक्त कन्नड व इंग्रजी भाषेत लिहिल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार जनतेच्या सोयीविरुद्ध तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणारा आहे.
तेंव्हा आमची तुम्हाला विनंती आहे की, संबंधित फलकांवर तात्काळ मराठी भाषेचाही अंतर्भाव करावा. जर असे झाले नाही तर बस स्थानकाच्या उद्घाटना दिवशी आंदोलन छेडून निदर्शने केली जातील. त्याचप्रमाणे कायद्याचा भंग केल्याबद्दल न्यायालयात धाव घेतली जाईल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
खानापूर तालुक्यात 85 टक्के पेक्षा अधिक मराठी भाषिक असतानाही खानापूर नूतन बस स्थानकामधील माहिती व नाम फलकांवर फक्त कन्नड आणि इंग्रजीला प्राधान्य देण्यात आले आहे. बस स्थानकामधील फलकांवर मराठीला हेतू पुरस्कार डावलण्यात आल्यामुळे मराठी भाषिकातून नाराजी पसरली आहे.
गेल्याच महिन्यात खानापूर नगरपालिकेतर्फे कन्नड फलकांच्या सक्तीचा आदेश देण्यात आला होता. त्यासाठी सुमारे 50 ते 100 दुकानांवर कारवाई करण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात आचार संहिता असल्याने ही कारवाई थांबविण्यात आली.
असली तरी नजीकच्या काळात खानापूर शहरासह तालुक्यात कन्नड सक्तीसाठी प्रशासन आग्रही राहणार आहे. दरम्यान खानापूर नूतन बस स्थानकातून मराठी हद्दपार झाल्याने मराठी भाषिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.