बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या शेतकरी नेत्या, रणरागिणी जयश्री गुरण्णवर यांचे बुधवारी (दि. २२) अल्पशा आजाराने निधन झाले.
हलगा-मच्छे बायपाससंदर्भात ठाम भूमिका घेणाऱ्या आणि समस्त शेतकरी बांधवांचा आधारवड ठरलेल्या जयश्री गुरण्णवर यांना अंतिम निरोप देण्यासाठी आज किल्ला तलावाजवळील सम्राट अशोक चौक येथून अंत्ययात्रा काढण्यात आली. दरम्यान राणी कित्तूर चन्नम्मा चौकात अंत्ययात्रा आल्यानंतर याठिकाणी उभारलेल्या गायीने सर्वांचेच लक्ष वेधले.
आई आणि गाई या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे बोलले जाते. शेतकऱ्यांसाठी जशी काळीमाय आई समान असते त्याचप्रमाणे गायीलाही आपली माय मानणारे शेतकरी! पण अचानक आपल्याला लळा लावलेली माणसे आपल्यातून निघून गेली कि जितका त्रास माणसाला होतो, तितकाच त्रास लळा लावलेल्या जनावरांनाही होती याचा प्रत्यय कित्येकांना आजवर आला असेल.
शेतकरी नेत्या जयश्री गुरण्णावर यांच्या अंत्ययात्रेदरम्यानही उपस्थित असणाऱ्या गायीकडे पाहून याचीच जाणीव झाली.
एका बाजूला सुरु असलेली अंत्ययात्रा, मान्यवरांची सुरु असलेली भाषणे, पाळण्यात आलेले मौन, शेतकऱ्यांकडून हिरवा टॉवेल हवेत उंचावून जयश्री गुरण्णावर यांना देण्यात आलेली मानवंदना आणि दुसरीकडे हे सर्व पाहून स्तब्ध उभी असलेली गाय खूप काही सांगून जात होती.
‘बेळगाव लाईव्ह’ च्या प्रतिनिधींनी टिपलेली हि दृश्ये निशब्द करणारी ठरत असून जणू आपले दुःख या अंत्ययात्रेवेळी व्यक्त करत असल्याचेच जाणवत आहे.