बेळगाव लाईव्ह : विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असणाऱ्या दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी कोणता अभ्यासक्रम निवडायचा हा मोठा प्रश्न असतो. मात्र या प्रश्नावर आता बेळगावच्या जीटीटीसी संस्थेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली असून नव्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
दर्जेदार शिक्षण, विविध क्षेत्रातील अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देत नोकरीची हमी देणाऱ्या विविध डिप्लोमा कोर्सची अंमलबजावणी जीटीसीसी च्या माध्यमातून करण्यात आली आहे. संपूर्ण कर्नाटकात ३३ प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणाऱ्या या संस्थेला एआयसीटीई ने मान्यता दिली आहे.
आर्टिफिशल इंटीलिजन्स अँड मशीन लर्निंग या नव्या कोर्ससह डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग, डिप्लोमा इन प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन ऍटोमेशन अँड रोबोटिक्स अशा नव्या कोऱ्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे.
उद्यमबाग औद्योगिक वसाहतीनजीक असणाऱ्या जीटीसीसी केंद्रात या नव्या प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तसेच या केंद्रातून प्रशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर रुजू झाले असून या केंद्राच्या माध्यमातून १०० टक्के नोकरीची हमी देण्यात येत आहे.
तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी या केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जीटीटीसीचे प्राचार्य बी.जी.मोगेर आणि विभाग प्रमुख रमाकांत मठ, अरविंद खडेद यांनी केले आहे.