बेळगाव लाईव्ह : निसर्गाचा प्रकोप आधीच काय कमी असतो म्हणून आता जनतेनेही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणण्याचे प्रकार सुरु केले आहेत. शेतात केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमुळे शेतीचे होणारे नुकसान या पाठोपाठ आता शेतजमिनीत अंधश्रद्धेपोटी पुरण्यात आलेल्या उताऱ्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
सध्या सर्वत्र पेरणीचा हंगाम सुरु आहे. दरम्यान शेतीच्या कामात व्यस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर भयानक प्रकार समोर आला आहे. जमिनीत पुरण्यात आलेल्या उताऱ्यांमुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. अमावस्या, पौर्णिमाच नव्हे तर दररोज हे प्रकार सुरु असल्याचे चित्र आहे.
नारळ, लिंबू, सुई, मोळे, काळा दोरा, कापड, चप्पल, कपडे यासह अनेक वस्तूंचा समावेश असलेल्या गोष्टी जादूटोण्यासाठी वापरण्यात येत असून गुलालासह या वस्तू शेतजमिनीत खड्डा काढून पुरण्यात येत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे.
मागील वर्षी पावसाने साथ न दिल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला. यंदा पाऊसमान समाधान कारक असल्याचे सांगण्यात येत असून या पार्श्वभूमीवर शेतकरीवर्ग उत्साहाने मशागतीची कामे करत आहे.
मात्र मशागत करताना असे प्रकार निदर्शनात आल्याने शेतकऱ्यांची धांदल उडत आहे. विज्ञानाने आज इतकी प्रगती करूनही अशापद्धतीने अंधश्रद्धा बळावत चालल्याचे प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार उघडकीस आले आहेत. मात्र आता पुन्हा ग्रामीण भागाकडे आणि विशेषतः शेतशिवारांमध्ये असे प्रकार घडत असून याबाबत नाराजी आणि संताप व्यक्त होत आहे.