बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या टिळक चौक येथे मद्यधुंद अवस्थेत असणारा माथेफिरू चक्क विजेच्या खांबावर चढल्याने या परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला.
माथेफिरू विजेच्या खांबावर चढून जोरजोरात गाणी गाऊ लागला. आणि मोठमोठ्याने ओरडूही लागला. शिवाय वीजखांबावरील वायर आणि इतर साहित्याची देखील नासधूस करत होता.
दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून हेस्कॉमने या भागातील वीजपुरवठा तब्बल १ तासाहून अधिक काळ खंडित केला.
यावेळी बघ्यांची गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात जमली कि या परिसरात बराच वेळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली. या भागातून ये जा करणाऱ्यांचे लक्ष सदर तरुणाच्या विकृत गोष्टीकडे वेधले गेल्याने अनेकांनी त्याला सुखरूप खाली आणेपर्यंत तिथेच थांबणे पसंत केले.
विद्युत खांबावर चढलेला तो तरुण हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी आटापिटा करूनही खाली उतरण्यास तयार नव्हता. मात्र अथक परिश्रमानंतर अखेर त्या तरुणाला हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी सुखरुपरित्या खाली उतरवले.