बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्यात ७ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये विदेशी अधिकारी दाखल झाले आहेत. भारतीय निवडणूक प्रक्रिया उत्तम असून आगामी काळात आपल्या देशात होणाऱ्या निवडणुकांदरम्यान भारतीय निवडणूक प्रक्रिया अबलांबणार असल्याचे मत विदेशी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच भारतीय निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनचा वापर केल्याचे कौतुक विदेशी अधिकाऱ्यांनी केले.
आज सकाळी कंबोडिया, मोल्डोवा , नेपाळ, सिशेल, ट्युनिशिया आदी देशातील निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी बेळगावमध्ये दाखल झाले. ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी करत मतदान प्रक्रियेचे कौतुक केले.
कर्नाटकात उद्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून आज ईव्हीएम मशीनसह निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारी निवडणूक सेवेत दाखल झाले आहेत. हि सर्व तयारी पाहत विदेशी अधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणेसह भारतीय निवडणूक प्रक्रिया आणि शैलीचे कौतुक केले.
हे विदेशी निवडणूक अधिकारी केवळ बेळगावमध्येच दाखल झाले असून आपल्यासाठी हि अभिमानाची बाब आहे, असे मत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी व्यक्त केले. उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून एकंदर मतदान प्रक्रियेची पाहणी विदेशी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी जवळून पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
कंबोडियाचे राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य हेल सराथ आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य सचिव हाऊट बोरीन, माल्डोव्हाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सदस्या डाना मँटेनुआ आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्थानिक जिल्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख एड्रियन गमार्ता,
नेपाळ निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार थापलिया, अवर सचिव थानेश्वरबुसाल, सेशेल्सचे निवडणूक आयोग प्रमुख डॅनी सिल्वा लुकास आणि आयुक्त निकोलस रॉस होरा,
ट्युनिशिया उच्च निवडणूक आयोगाचे महम्मद तीली आणि प्रादेशिक संचालक जेल्लाली निबिन आदी अधिकाऱ्यांनी बेळगावमधील मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, निवडणूक अधिकारी उपस्थित होते.