बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात मोकाट भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढले असून कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात एक बालक जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी न्यू गांधीनगर येथे घडली.
न्यू गांधीनगर येथे आपल्या घराजवळ खेळणाऱ्या एका बालकावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केला. कुत्र्याच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या बालकाला उपचारासाठी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे जखमी बालकाच्या पालकांसह परिसरातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून सर्वजण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बेळगाव महापालिकेला लाखोल्या वाहत आहेत.
अलीकडे शहरातील प्रामुख्याने न्यू गांधीनगर आणि उज्वलनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून येथील रहिवाशांना भीतीच्या छायेत वापरावे लागत आहे उपलब्ध माहितीनुसार गेल्या अवघ्या महिन्याभरात शहरात 10 हून अधिक जण कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.
सदर भटकी कुत्री रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून तर जातातच खास करून लहान मुलांच्या बाबतीत आक्रमक होऊन त्यांच्यावर हल्ला करतात. यासंदर्भात वारंवार आवाज उठवून तक्रार करून देखील अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही न करता डोळेझाक केली जात आहे.
त्यामुळे शहराच्या काही भागातील नागरिकांना घराबाहेर पडल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे. तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने उपद्रवी भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.