बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात उद्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदान होणार असून खासदारपदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. मंगळवार दि. ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून आज निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारी मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनसह इतर निवडणूक साहित्य घेऊन रवाना झाले आहेत.
आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ईव्हीएम मशीन व साधनसामग्रीं वितरण केंद्राला भेट दिली. कर्नाटक राज्यातील उत्तर कर्नाटकातील 14 जिल्ह्यात उद्या मंगळवारी मतदान होत आहे. यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे.
सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्ह्यातील मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता येईल. दरम्यान निवडणुकीसाठी ४५२४ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत व्यवस्थित पार पडण्यासाठी 34 हजार कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.यामध्ये 24 हजार कर्मचारी आणि दहा हजार हे पोलीस व सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवार रिंगणात आहेत तर चिकोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये 18 उमेदवार आहेत जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात 41 लाख 5 हजार 225 मतदार आहेत बेळगावला 19 लाख 23 हजार 788 मतदार असून,चिकोडी मतदारसंघांमध्ये 17 लाख 61 हजार, 694 मतदार आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात बेळगाव जिल्ह्यातील खानापूर व कित्तूर मतदारसंघ जोडले आहेत. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात मिळून चार लाख 19 हजार 743 मतदार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
निवडणूक कामासाठी परिवहन मंडळाकडून 1524 बसेस निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या देखरेखीखाली उद्याच्या मतदानासाठी आवश्यक असलेली मतदान यंत्रणा पाठविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मतदान साहित्य, साधनसामग्रींचे निवडणूक विभागाकडून संबंधित पोलींग पार्टींना वितरण करण्यात येत आहे.