बेळगाव लाईव्ह :सलग दिवसांमधील वादळी मुसळधार पावसामुळे झालेल्या गंभीर नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेने आपत्ती निवारण कार्ये हाताळण्यासाठी युद्धपातळीवर 4 विशेष बचाव हेल्पलाइन पथके स्थापन केली आहेत. महानगरपालिका आयुक्त पी. एन. लोकेश यांनी या पथकांच्या स्थापनेची घोषणा केली आहे.
आयुक्त लोकेश यांनी पथकांची घोषणा करण्याबरोबरच शहरातील चार विभागीय कार्यालयांपैकी प्रत्येक कार्यालयात एक समर्पित आपत्ती प्रतिसाद पथक सुसज्ज असल्याची खातरजमा करून घेतली. या प्रत्येक पथकात एका प्रमुखासह 11 सदस्यांचा समावेश आहे.
या पथकांवर वादळी हवामानामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत आपापल्या उपविभागांमध्ये जलद बचाव कार्य हाती घेण्याची जबाबदारी असेल. सदर पथकांचे प्रमुख पुढीलप्रमाणे आहेत. उत्तर उपविभाग 1 : सचिन कांबळे (संपर्क -8867295104). उत्तर उपविभाग 2 : अंकित (संपर्क -8892580045). दक्षिण उपविभाग 1 : परशुराम (संपर्क – 9538477634). दक्षिण उपविभाग 2 : किरण मंत्रीकेरी (संपर्क -9449731560).
विशेष बचाव हेल्पलाइन पथकांमध्ये बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता, पर्यावरण अभियंता, आरोग्य निरीक्षक, महसूल निरीक्षक आणि बिल जमा करणारे यांचा समावेश आहे.
आयुक्तांच्या निर्देशानुसार या पथकांच्या सदस्यांनी प्रतिकूल हवामानामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीला किंवा आणीबाणीच्या परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देणे आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीच्या कर्तव्यात सहभागी झाल्यामुळे पालिकेकडून मिळालेल्या अपुऱ्या प्रतिसादाने नुकत्याच झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे बेळगाव रहिवाशांना संघर्षाचा सामना करावा लागला.
याची गांभीर्याने दखल घेत ही पथके स्थापण्यात आली आहेत. आयुक्तांनी सोमवारी वैयक्तिकरित्या जातीने नुकसानीचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या आणि मदतीची तात्काळ गरज लक्षात घेतली.
दरम्यान, रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे की पावसामुळे उद्भवलेल्या कोणत्याही समस्यांबद्दल त्यांनी त्यांच्या संबंधित विभागीय कार्यालयात त्वरित तक्रार करण्याद्वारे नव्याने स्थापण्यात आलेल्या बचाव पथकांकडून तात्काळ कार्यवाही सुनिश्चित करावी.
या पद्धतीने शहरावरील अशा नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव कमी करण्याच्या उद्देशाने नजीकच्या पावसाळ्यापूर्वी समर्पित बचाव पथके स्थापण्याची ही क्रियाशील उपाययोजना बेळगाव महापालिकेकडून प्रथमच राबविली जात आहे.