बेळगाव लाईव्ह : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस अनिल चौहान यांनी अग्नीवीर जवान आणि अग्नीवीर वायू यांना मार्गदर्शन केले.सोमवारी त्यांनी बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर आणि सांबरा येथील एअरमेन ट्रेनिंग स्कूलला(ATS) भेट दिली.
सुरुवातीला मराठा रेजिमेंटल सेंटरला भेट देत त्यांनी भारतीय सैन्यातील जवानाकडे बुद्धिमत्ता, दृढनिश्चय आणि दूूरदृष्टी असणे आवश्यक आहे. आधुनिक युद्धामध्ये सायबर वॉर आणि आर्टिफिशिएल इंटेलिजन्सचा वापर करण्यात येतो. त्यामुळे खर्या सैनिकाने नेहमी नव्या कला शिकण्यासाठी पुढाकार घ्यावा. अग्नीवीर केवळ जवान नसून ते देशाचे सार्वभौमित्व अबाधित राखणारे नेते आणि रक्षक आहेत, असे प्रतिपादन सीडीएस (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान यांनी केले.
अग्नीवीरांच्या तुकडीला मार्गदर्शन करताना लष्करी सेवेचा उदात्त हेतू आणि लष्करी चौकटीतील तिची महत्वाची भुमिका अधोरेखित केली.नवीन तंत्रज्ञान युद्धाचा अविभाज्य अंग आहे. लढाईसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य आहे. त्यामुळे सैनिकाने आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाचा वापर देशाच्या हितासाठी करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणासाठी अनुकूल वातावरण निर्माण केल्याबद्दल आणि अग्निवीरांना सर्वोत्तम प्रशिक्षण दिले जात असल्याबद्दल रेजिमेंटल सेंटर आणि प्रशिक्षकांच्या टीमचे कौतुक केले. सशस्त्र दलांचे भविष्य घडवण्यात व्यावसायिक प्रशिक्षकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचेही कौतुक केले. यावेळी मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
एअरमन ट्रेनिंग स्कूलला ही दिली भेट
जनरल चौहान यांनी एअर कमोडोर एस. श्रीधर यांच्यासमवेत एअरमेंट ट्रेनिंग स्कूलचा दौरा केला. वायू अग्निवीर प्रशिक्षणाची माहिती घेतली.
अग्निवीर प्रशिक्षणार्थींच्या तिसऱ्या तुकडीशी देखील संवाद साधला. त्यांनी भविष्यातील युद्धाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असलेल्या तांत्रिकदृष्ट्या कुशल सैनिक बनण्यासाठी प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. शिकणे ही एक आजीवन प्रक्रिया आहे, विशेषत: युद्धाच्या सतत विकसित होत असलेल्या आणि गतिमान क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यामुळे जवानांनी कौशल्यांच्या सतत उन्नतीसाठी तयार राहावे, असे सांगितले.
प्रशिक्षणार्थींना उत्कृष्टतेसाठी सचोटी, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि एस्प्रिट-डी-कॉर्प्स या मूल्यांचे पालनपोषण करण्याचा सल्ला दिला.
प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करून, सीडीएसने एटीएसच्या प्रशिक्षण शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांना राष्ट्राच्या सामर्थ्यासाठी उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले.