बेळगाव लाईव्ह :बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डामधील 29 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी सुरू होऊन सीईओ के. आनंद यांच्या आत्महत्येमुळे मध्यंतरी कांही काळ थांबलेली सीबीआय चौकशी आता पुन्हा सुरू झाली असून गेल्या शनिवारपासून सीबीआयचे पथक पुनश्च कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये दाखल झाले आहे.
बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातील 29 कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी मोठ्या भ्रष्टाचाराची तक्रार झाल्यानंतर गेल्या 16 नोव्हेंबर 2023 पासून सीबीआयच्या पथकाने चौकशीला सुरुवात केली होती.
कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड सीईओंच्या बंगल्यामध्ये ही चौकशी सुरू होती. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसह कर्मचारी व नातेवाईकांना चौकशीला सामोरे जावे लागले.
तथापि त्यानंतर 23 नोव्हेंबर 2023 पासून सीईओ के. आनंद यांच्या बंगल्याचा दरवाजा बंद झाला तो दोन दिवसांनी म्हणजे 25 नोव्हेंबरला फोडून उघडण्यात आला. त्यावेळी सीईओ के. आनंद यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.
परिणामी सीबीआय पथकाची चौकशी थांबली होती. त्यावेळच्या चौकशीत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांनी सीबीआय पथकाची भेट घेऊन भरती करता पैसे दिल्याची कबुली दिली होती. मात्र आता सीबीआयचे पथक पुन्हा चौकशीसाठी कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये दाखल झाले आहे.