बेळगाव लाईव्ह :कणबर्गी येथील शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असतानाही बुडाने त्यांच्या हद्दीमध्ये खांब रोवून दडपशाही करत त्या जागेचा सर्व्हे केल्याची घटना काल मंगळवारी घडली.
त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी निविदा न मागवता सुरू करण्यात आलेले हे काम बेकायदेशीर असून ते तात्काळ थांबवावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचा अर्थात बुडाचा कणबर्गी येथील शेतकऱ्यांची जमीन घेऊन त्या ठिकाणी आपली स्कीम क्र. 61 राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सदर जागेत अनेकांनी घरे तर बांधली आहेतच शिवाय काही रियल इस्टेटधारकांनी शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी ताब्यात घेतले आहेत.
खरेदी -विक्री झाली असताना, तसेच 25 एकर मधील शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवलेली असताना बुडाने अचानक सर्व्हे करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याकडील स्थगिती आदेश झाकून शेतकऱ्यांनी जाब विचारला असता आम्ही तुमची जमीन सोडून सर्व्हे करत आहोत, असे उत्तर बुडाच्या अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे.
शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधामुळे गेली कांही वर्षे बुडाच्या स्कीम क्र. 61 चे काम थांबले होते. मात्र आता पुन्हा ही स्कीम राबविण्याचे प्रयत्न सुरू झाले असून यामध्ये रियल इस्टेटधारकही सामील असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बुडाने सुरू केलेल्या सर्व्हेच्या विरोधात शेतकऱ्यांनी मंगळवारी स्थगिती आदेशासह लेखी तक्रार दाखल केली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून त्याविरुद्ध आपण पुन्हा न्यायालयीन लढा देणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान कालच्या सर्व्हेच्या कामासाठी कोणत्याही प्रकारची निविदा मागवण्यात आलेली नाही निविदा नसतानाच हे काम सुरू करण्यात आल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येतात त्यांनी हे बेकायदेशीर काम तात्काळ थांबवावे अशी मागणी केली आहे याबाबत बुडा आयुक्तांना काही शेतकऱ्यांनी निवेदनही दिले आहे.
शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेतली असतानाही बुडाने काल त्यांच्या हद्दीमध्ये खांब उभे केले. तथापि शेतकऱ्यांनी ते खांब काढून टाकले. तसेच यापुढे आमच्या जागेमध्ये जर तुम्ही खांब रोवाल तर आम्ही शांत राहणार नाही, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.