बेळगाव लाईव्ह :स्टार एअरलाइन्स कंपनीने येत्या 14 जूनपासून बेळगाव ते सुरत आणि सुरत मार्गे बेळगाव ते किशनगड (अजमेर) ही आपली एम्बरर विमानाची उड्डाणे बंद करणार असल्याची घोषणा केली.
विमान कंपनीने सदर मार्गांसाठी बुकिंग स्वीकारणे आधीच बंद केले आहे. उडान योजनेंतर्गत डिसेंबर 2020 मध्ये सुरू झालेल्या या सेवा जवळपास चार वर्षांपासून कार्यरत आहेत.
त्यांची लोकप्रियता आणि व्याप्ती दर 90 टक्क्याहून जास्त असून देखील स्टार एअरलाइन्सने त्या बंद करण्याचे अधिकृत कारण दिलेले नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार विमानाच्या रोटेशनच्या गरजा संपुष्टात आल्या आहेत.
सुरत आणि अजमेर यांना जोडणारी एकमेव हवाई सेवा असलेले हे मार्ग स्टार एअरने बंद केल्याने या सोयीस्कर कनेक्शनवर अवलंबून असलेल्या अनेक प्रवाशांचा प्रवास विस्कळीत होण्याची, त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
वास्तविक पाहता बेळगावहून गुजरात राजस्थानला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती अनेकांना ती सोयीस्कर होती मात्र स्टार एअर बेळगाव सुरत आणि बेळगाव किशनगड (अजमेर) या विमान सेवा बंद केल्याने या भागातील राजस्थान गुजरात जाणाऱ्यांना गैरसोय होणार आहे. बेळगावहून मुंबई हैदराबाद किंवा अन्य शहराचा स्टॉप घेऊन त्यांना पुढचा प्रवास करावा लागणार आहे.