Tuesday, January 14, 2025

/

अनपेक्षित पावसाळा: जीव सांभाळा

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:मागील आठवड्यात नेमेचि येतो रोज पाऊस असे वातावरण आहे. हे वातावरण समाधानाचे आहे. उकाड्यात गारवा देणारा पाऊस दुपार नंतर पडू लागतो आणि जीव सुखावतो. मात्र या अनपेक्षित पावसाने अनेक आव्हाने उभी केली आहेत. अचानक साचणारे पाणी, तुडुंब भरल्याने कोंडलेली गटारे या समस्या डोळे वर काढत आहेत. घरा घरात पाणी घुसले, कुठे घरांच्या भिंती कोसळल्या किंवा घरा गाड्यांवर झाडे, जाहिरात फलक किंवा विजेचे खांब कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पाऊस येणार म्हणून आपत्ती नियंत्रण हवे ते दिसत नसल्याने उद्भवणाऱ्या या घटना आहेतच…. या सर्व घटना मानवी चुका उघड पाडवणाऱ्या आहेत. दरम्यान या पावसात काही चुका स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका पोहोचवण्यासाठी जबाबदार ठरत आहेत. आपण या अनपेक्षित पावसात होणाऱ्या मानवी चुका आणि त्या रोखण्याची गरज यावर या लेखात विशेष लक्ष देणार आहोत.

धावाधाव ही पहिली चूक
पाऊस सर्वांनाच अपेक्षित आहे. तो पडावा ही सर्वांचीच अपेक्षा आहे. पण तो उन्हाळ्यात येतो त्यामुळे सद्या अवकाळी किंवा अनपेक्षित अशा सदरात मोडला जातो. कारण याकाळात तो नियमित नव्हे तर कधीही पडू शकतो. तो कधीतरी पडणार आहे, याची आम्हाला माहिती असते मात्र नेमकी वेळ ठाऊक नसते. यामुळे त्याला तोंड देण्याची आपली तयारी नसते. तयारी म्हणजेच आपल्या वाहनात छत्री किंवा रेनकोट नसतोच.
पाऊस येणार याची चाहूल मिळते म्हणजेच वातावरण ढगाळ होते किंवा घडघडू लागते तेंव्हा आपल्या छातीत थोडी का होईना धडकी ही भरतेच. आपण पायी चालत फिरत असलो तर आपण भराभर चालू लागतो. मोटारसायकलीचा वेग आपसूकच वाढतो. आणि आपण वेगवान होतो. पावसाचे बारीक बारीक थेंब पडू लागले तर हा वेग आणखीनच वाढतो आणि रस्त्यांवर एकप्रकारची स्पर्धा सुरू होते. आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्याठिकाणी लवकर पोचण्याची. मात्र आपण पावसाला हरवू शकत नाही आणि मग आपण भिजत भिजत एकमेकाला आदळतो, कधी पडतो, कधी दुसऱ्याला धक्का देऊन पुढे जातो. यात छोटे आणि मोठे असे दोन्ही प्रकारचे अपघात घडतात. बरे वाईट घडले जाते. यासाठी आपण या पॅनिक स्टेजमध्ये असताना वाहन वेग वाढवून स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालतो. तसे न करता जोवर पाऊस सुरू होत नाही तोवर योग्य वेग राखून आणि इतरांचाही काळजी घेऊन आपली दुचाकी चालवत राहिलो तर अनेक वाईट घटना टाळता येतील. पावसाचे थेंब पडू लागले तर आपण अडकलो आहोत हे मान्य करून सुरक्षित ठिकाणी थांबणे आणि पाऊस जाण्याची वाट बघणे हा सुरक्षित पर्याय आहे. तो मान्य नसेल तर आपल्याकडे रेनकोट असणे आवश्यक आहे. रेनकोट घाला आणि खुशाल पावसाचा आनंद घेत सावकाश गाडी चालवा. गडबड करून आपण पावसाला हरवू शकणार नाही, भिजणार ते भिजणारच आणि जीवाचीही भीती….हे टाळायला हवे.

रस्त्यांची समस्या
या साऱ्या प्रकारात आपल्या डोक्यात रस्त्यांवर येणाऱ्या अडथळ्यांची कसरत करावी लागते. मात्र त्याचे भान बरेचजण ठेवत नाही. हे दिसून येते. रस्त्यात साचलेल्या पाण्यातून गाडी मारताना खड्यात पडून हात पाय मोडून घेणारे अनेक आहेत. दुसऱ्याने गडबड केली म्हणून अचानक रस्त्याच्या कडेला जाऊन बाजूच्या चिखलात अडकून अनेकजण पडतात. मार लागतो, डोके आपटले तर जीव जातो याचे भान ठेवायला हवे. नाहीतर मग अनपेक्षित आलेला पाऊस वाईट करून गेला असे खडे फोडत राहावे लागते. आपणच चुकतोय हे विसरून चालणार नाही.Rain

आता कारवाल्यांसाठी
पाऊस येणार आणि भिजणार ही भीती वाटून टू व्हीलर वाले धावपळ करतात, हे सत्य आहे. मात्र त्यांची ही जीवघेणी कसरत सुरू असताना कार वाले सुद्धा मागे राहात नाहीत. ते ही आपला वेग वाढवतात. त्यांना तर भिजण्याची सुद्धा भीती नसते मात्र तेही रस्त्यावर साचलेले पाणी उडवत, कधी ठोकत कधी पाडवत आपली गाडी रेटत राहतात. वेगवान जीवन झाले आहे, पण नैसर्गिक परिस्थितीचे भान बाळगायला नको का? आपल्याकडे कार आहे, आपण हळू जाऊ याचे भान नको का?
बरेचदा फोर व्हीलर वाल्यांच्या या स्पर्धेत अनेक टू व्हीलर वाले पडून जखमी होतात. वरून पाऊस सुरू आहे, साचलेल्या पाण्याखाली किती मोठा खड्डा आहे माहित नाही. त्यात सुसाट वेगाने एकादी कार येते आणि सगळ्यांना संकटात टाकून जाते. अशावेळी विचार नको का करायला? कार चालकांना एक विनंती आहे, पाऊस पडायला लागला की सगळा रस्ताच रिकामा होणार असतो. त्यामुळे तो सुरवातीच्या टप्प्यात असताना तरी किमान तुमच्या वेगाला लगाम द्या, नाहीतर तुमच्या गडबडीत समोरचा बाईक किंवा सायकल वाला गोंधळला जाऊन नको ते होऊ शकते.

गरम रक्तासाठी….
या परिस्थितीत सर्वात धोकादायक ठरतात ते गरम रक्त वाले. म्हणजेच तरुण तडफदार. त्यांच्या बाइकचा सायलेंसर नसतो. प्रचंड आवाज करत ते झुप करून निघून जातात. यावेळी गडबडीत असणाऱ्या मध्यमवयीन आणि वृद्ध लोकांची आणि विशेषतः महिला वर्गाची अवस्था कठीण होते. त्यांना कळतच नाही विमान गेले की हेलिकॉप्टर. अनेकजण गोंधळून पडतात. शिवाय हे झुप वालेही पडून अनेक घटना घडलेल्या आहेत. अशांनी बेळगावात हाडे मोडल्यावर जिथे उपचार केले जातात अशा हॉस्पिटलना किमान एकदा भेट द्यावी. मोडलेली हाडे जोडण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया, होणारे त्रास, रॉड घातल्याने विव्हळत पडलेले पेशंट बघून यावेत, म्हणजे नक्कीच वेग कमी होऊ शकतो.
पाऊस हा आनंदाचा सोहळा व्हायला हवा, पाऊस हा उत्साह देणारा आणि प्रेमाचा ऋतू आहे त्याचा गोडवा टिकायला हवा. नपेक्षा आपण कुठल्यातरी इस्पितळात पडलेलो आहोत आणि मोडलेल्या हाताची आणि पायाची वेदना सहन करीत साऱ्या जगाला गरज आहे त्या पावसाच्या नावाने बोटे मोडत आहोत. ही कल्पनाच न केलेली बरी.
सावध व्हा, सजग व्हा, अनपेक्षित घटना टाळा. नियमित पाऊस भरपूर पडावा आणि आपण सुरक्षितपणे त्याचा आनंद घेत आहोत… अशी कामना करूया….

प्रसाद सु. प्रभू(जेष्ठ पत्रकार बेळगाव)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.