बेळगाव लाईव्ह :जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खाते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंबा महोत्सवामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या महोत्सवांतर्गत 45 टन आंब्याची विक्री झाली आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत आणि बागायत खात्यातर्फे क्लब रोड येथील ह्युम पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय आंबा महोत्सवाची नुकतीच सांगता झाली.
आंबा उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे. शेतकऱ्यांच्या शिवारातील आंबा थेट ग्राहकांना उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर महोत्सवात बेळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आले होते.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 29 हजार हेक्टर क्षेत्रात आंबा पिकविला जातो आणि ज्याद्वारे एकरी 5 ते 6 टन आंब्याचे उत्पादन मिळते. आंबा महोत्सवात रत्नागिरी, देवगड, सावंतवाडी, कणकवली परिसरातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनाही संधी देण्यात आली होती.
परिणामी खवय्यांना कोकणातील रुचकर आणि चविष्ट आंबा बेळगावात रास्त किमतीत उपलब्ध झाला होता. महोत्सवात केसर 500 रु., हापूस 400 ते 500 रु., पायरी 300 रु., रत्नागिरी 400 रु. डझन या दराने आंबे विक्री करण्यात आली.
याव्यतिरिक्त सदर महोत्सवाद्वारे ‘बेळगाव आंबा’ हा ब्रँड रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यालाही खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. महोत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी करणाऱ्या खवय्यांनी तीन दिवसात चक्क 45 टन आंब्यांची खरेदी केली हे विशेष होय.