बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून उन्हाचा तडाखा असह्य होऊ लागला आहे. आता तर हवामान खात्याने येत्या रविवारी 5 मेपर्यंत बेळगावसह राज्यात उष्णतेची लाट तीव्र होणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार उष्म्याची तीव्रता वाढल्यामुळे हैराण झालेल्या बहुतांश नागरिकांनी दुपारच्या वेळी घरी राहणेच पसंत केले आहे.
बेळगावसह राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये येत्या रविवारपर्यंत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मान्सूनपूर्व पाऊस लांबल्यामुळे उष्णतेची लाट वाढत असून तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या कांही दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावून देखील उन्हाची तीव्रता कमी झालेली नाही.
यंदा आठवड्यापूर्वी बेळगाव शहराचे तापमान सर्वाधिक 39.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले होते, तर काल गुरुवारी पारा 39.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. दरवर्षी मार्चपासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा बेळगावसह कांही जिल्ह्यात पडलेला तुरळक पाऊस वगळता पुन्हा पाऊस झालेला नाही.
पावसाअभावी तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढवून उष्ण वारे वाहणार असल्याचेही सांगितले जात आहे. एकंदर वाढत्या उष्म्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील हैराण झाले असून येत्या दोन दिवसात राज्यात कांही ठिकाणी कमाल तापमान हे 42 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, हवामान खात्याकडून राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीचे संकेत वर्तविण्यात आले आहेत. त्यामध्ये बेळगावसह बिदर, गुलबर्गा, विजापूर, यादगिरी, रायचूर, बागलकोट, गदग, हावेरी, कोप्पळ, बळळारी, विजयनगर, दावणगिरी, चित्रदुर्ग, मंड्या, तुमकुर, कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये येत्या 5 मे पर्यंत उष्णतेची लाट असणार आहे.