बेळगाव लाईव्ह:मुलींच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी बालिका आदर्श विद्यालय उत्तम केंद्र बनले असून या शाळेच्या 1937 ते 2024 सालापर्यंतच्या माजी विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा येत्या रविवार दि. 26 मे रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती टीएफई सोसायटीचे चेअरमन गोविंद फडके यांनी दिली.
बालिका आदर्श विद्यालयांमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. स्नेहमेळावा आणि शाळेच्या वाटचालीची माहिती देताना फडके म्हणाले की, येत्या रविवारी भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालय येथे होणाऱ्या स्नेहमेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. आसावरी संत उपस्थित राहणार आहेत.
तीन सत्रात होणाऱ्या स्नेहमेळाव्यात शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल. संस्थेच्या सचिव माधुरी शानभाग यांनी समर्पित भावनेने शिकणाऱ्या शिक्षकांमुळे बालिका आदर्शमध्ये शिक्षण घेतलेल्या मुली देश-विदेशात विविध पदावर काम करत आहेत. मुलींची सुरक्षितता हे शाळेचे वैशिष्ट्य आहे. शाळेत संगणक कक्ष, अटल टिंकरिंग लॅब, अत्याधुनिक टर्फ मैदान, विज्ञान प्रयोगशाळा, बॉक्सिंग रिंग, कुस्ती रिंग अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत असे सांगून विद्यार्थिनींनी शाळेचे नांव राष्ट्रीय स्तरावर नेले असल्याचे स्पष्ट केले.
सहसचिव प्रा. आनंद घाडगीळ यांनी यावेळी बोलताना 10 वर्षापूर्वी शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. शाळेच्या नियोजित बांधकामासाठी मदत व्हावी, हा देखील या वेळेचा स्नेहमेळावा आयोजित करण्याचा उद्देश आहे. स्नेहमेळावा भव्यदिव्य होण्यासाठी माजी विद्यार्थिनींना निमंत्रणे दिली जात आहेत अशी माहिती दिली.
पत्रकार परिषदेस शाळेचे मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यांच्यासह माजी विद्यार्थिनी लक्ष्मी मोहनदास, पुनम पालेकर, स्वाती मुतकेकर, प्रियांका बिर्जे, निशा ठक्कर आदी उपस्थित होते.