Wednesday, January 8, 2025

/

बेळगावात होणार अत्याधुनिक वन्य जीव संरक्षण व पुनर्वसन केंद्र

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बंगळूर आणि म्हैसूर नंतर राज्यातील तिसरे व उत्तर कर्नाटकातील पहिले आणि एकमेव असे अत्याधुनिक ‘वन्य जीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ बेळगाव येथे सुरू केले जाणार असून त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे धाडण्यात आला आहे.

वन्यजीव तज्ञांच्या मते बेळगावमध्ये वन्य प्राण्यांची काळजी आणि संरक्षणासाठी बेंगळूर आणि म्हैसूर प्राणीसंग्रहालयापेक्षा चांगले वातावरण आहे.

त्यामुळेच भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाच्या आवारात वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची योजना आखण्यात आली आहे.

सदर पुनर्वसन केंद्र सुरू झाल्यास उत्तर कर्नाटकात संरक्षित असलेल्या प्राणी आणि पक्षांवर उपचार व काळजी घेण्यासाठी या केंद्राची मदत होईल. याखेरीज प्राणी संग्रहालयाच्या आवारात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एक सभागृह (एम्फी थिएटर) बांधण्यात येणार आहे.

त्यासाठी प्राणी संग्रहालयाची व्याप्ती देखील वाढवली जाणार आहे. राज्यातील सर्वाधिक पर्यटक भेट देणाऱ्या प्राणीसंग्रहालयाच्या यादीत बेळगावचे भूतरामनहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय चौथ्या क्रमांकावर आहे. या प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, बिबटे, तरस, अस्वल, मगरी, सांबर, हरीण, काळवीट आदी विविध वन्य प्राण्यांसह 201 प्रकारचे पशु-पक्षी आहेत.

नव्या प्रकल्पांबद्दल माहिती देताना बेळगाव जिल्हा वनसंरक्षणाधिकारी शंकर कल्लोळीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयात एमपी थिएटर बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी माहितीपटांच्या माध्यमातून पर्यटकांना जैवविविधतेची माहिती करून दिली जाणार आहे.

तसेच उत्तर कर्नाटकातील पहिले वन्यजीव संरक्षण आणि पुनर्वसन केंद्र या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला असून त्याला मंजुरी मिळताच हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत, असे सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.