बेळगाव लाईव्ह:दुष्काळामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये लोकांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना खुश करण्यासाठी विशेष करून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात आता पाण्यावरील राजकारणाने आघाडी घेतली आहे.
भाजपचे उमेदवार अण्णासाहेब जोल्ले जे पक्षाचे तिकीट मिळवण्यात दुसऱ्यांदा यशस्वी झाले आहेत, त्यांना चिक्कोडी मतदारसंघात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्याशी कडवी लढत द्यावी लागत आहे.
उमेदवार जोल्ले यांनी गेल्या शनिवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन कोयना आणि वारणा जलाशयातून कृष्णा व वेदगंगा नदीपात्रात 3 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. या पद्धतीने पाणी सोडण्यात आले तर चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग वगैरे अनेक तालुक्यातील पाण्याची समस्या तात्पुरती मिटणार आहे.
दरम्यान हुक्केरीचे आमदार निखिल कत्ती यांनी एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे चित्रा जलाशयातून हिरण्यकेशी नदीत 1 टीएमसी पाणी सोडण्याची विनंती केली आहे. पत्रकारांशी बोलताना अण्णासाहेब जोल्ले यांनी आपल्या विनंतीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले. याप्रसंगी आमदार शशिकला जोल्ले, दुर्योधन एहोळे आणि माजी आमदार श्रीमंत पाटील उपस्थित होते.
याचवेळी बेळगावचे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टन्नावर यांनी बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आज 1 एप्रिलपासून हिडकल जलाशयामधून घटप्रभा नदीत 2.5 टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश जारी केला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विनंतीवरून शेट्टन्नावर यांनी हा आदेश जारी केला आहे.
हिडकलचे पाणी घटप्रभा उजव्या शाखेचा कालवा (जीआरबीसी), चिक्कोडी उपविभाग कालवा आणि मार्कंडेय कालवा यामध्ये येत्या 10 ते 20 एप्रिल या कालावधीत सोडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे घटप्रभा डाव्या शाखेच्या कालव्यामध्ये (जीएलबीसी) येत्या 20 ते 30 एप्रिल या कालावधीत पाणी सोडले जाईल. हेच पाणी कोटबागी, कलकडी आणि श्री रामेश्वर उपसा जलसिंचन प्रकल्पासाठीही सोडण्यात येईल.
पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांनी अपव्यय होणार नाही याची काळजी घेत फक्त पिण्यासाठीच वापर करावा, अशी विनंती मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली आहे.