बेळगाव लाईव्ह विशेष : जाहिरातबाजी, प्रलोभने, आमिषे अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून जरी राष्ट्रीय पक्ष मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न करत असले तरी जनता आता जागरूक झाली आहे. आपला नेता कसा असावा, कोण असावा याबाबत जनता आता सजगपणे निर्णय घेण्यास सक्षम झाली असून याची झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
एखाद्या नेत्याच्या किंवा कोणत्याही पद्धतीच्या राजकीय पोस्टवर नेटकऱ्यांकडून जाहीरपणे आणि खंबीरपणे मत व्यक्त करताना दिसून येत असून जनता यंदाच्या निवडणुकीत कुणाला झुकते माप देईल, याकडे राजकारण्यांचे लक्ष वेधले आहे. बेळगावमध्ये निवडणूक लढविणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या उमेद्वारांसंदर्भात सध्या असाच प्रत्यय येत असून काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर आणि भाजपचे जगदीश शेट्टर यांच्याबाबत सोशल मीडियावर जनतेतून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया वाचायला मिळत आहेत. शिवाय लोकसभा निवडणुकीत निर्णायक मते घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराला मिळत असलेल्या पाठिंब्यामुळेही राष्ट्रीय पक्षांची कोंडी झाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसमधून निवडणूक लढविणारे मृणाल हेब्बाळकर यांची ओळख जरी तशी बेळगावकरांना असली तरी त्यांचं कर्तृत्व काही नाही. मराठीसाठी योगदान काही नाही. घराणेशाहीतून संपूर्ण कुटुंबच सध्या सत्तेत जाऊ पाहात आहे. त्याचबरोबर मराठीच्या कोणत्याही मुद्द्यावर ठोस भूमिका न घेता केवळ दिखाऊपणा केलेल्या या घराण्याला मराठी माणसाने नक्कीच वेचून बाजूला काढलं पाहिजे. याचं मुख्य कारण म्हणजे मराठी माणसाला त्यांनी पैशाचे, कुकरचे आमिष दाखवून, विविध प्रलोभने दाखवून खरेदी केले. आणि मराठी माणसाचा अक्षरशः ग्रामीण भागातून पायाच उखडून काढण्यात आला.
ज्या मोदींना बेळगावचा सीमाप्रश्न दिसत नाही, मराठी माणसावर होणारे अत्याचार दिसत नाहीत, मराठी माणसाने ६७ वर्षांचा लढा दिसत नाही, मराठी माणसाने त्यांच्याकडे पत्र पाठवून अनेकवेळा याचना केल्या, कि मराठी माणसाला माणसाप्रमाणे जगू द्या, त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं. याउलट त्यांनी दक्षिणेतल्या आमदारांच्या आग्रहास्तव बेळगावमध्ये मोठी रॅली काढली, या सर्व गोष्टी पाहिल्या तर मराठी माणसाने मोदींच्या नावावर मत द्यावं असं अजिबात नाही.
महाराष्ट्र एकीकरण समितीने जे मत दिलेले आहे जे मत केवळ मत नाही तर मराठी माणसाच्या रक्ताने लिहिलेला शब्द असेल. कारण मराठी माणसाने ६७ वर्षे लाठ्या-काठ्या झेलल्या. सीमाभागातील कोणताही मराठी माणूस असा नाही जो आंदोलनात सहभागी झाला आणि त्याच्या अंगावर एकही वार नाही कि ज्याच्या अंगावर कर्नाटकी पोलिसांच्या लाठ्या पडल्या. या प्रत्येक लाठीचा आवाज जर उठवायचा असेल तर प्रत्येक मराठी माणसाने मतपेटीत आपले मत नोंदविले पाहिजे.
मराठी माणसाच्या छाताडावर ज्यांनी विधानसौध बांधली, सीमाप्रश्न संपला असे विधान करून मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळले, ज्या माणसाला मराठीविषयी आपुलकी नाही अस्मिता नाही, जाण नाही, एक शब्दही मराठीतून बोलता येत नाही, मराठी आमदार ज्यावेळी विधानसभेत बोलले त्यावेळी त्यांना संसदेत पाठवा असे वक्तव्य केले अशापद्धतीच्या १०० टक्के मराठीविरोधी असणाऱ्या माणसाला मराठी माणसाने मत टाकावे हा राष्ट्रद्रोह आहे. शिवद्रोह आहे. हा ट्रेंड सध्या जगदीश शेट्टर यांच्याबाबत सोशल मीडियावर सुरु आहे.
अलीकडे सर्वच गोष्टींचा अंदाज बहुतांशी सोशल मीडियावरील ट्रेंडवर अवलंबून असलेला पाहायला मिळतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात राजकीय पातळीवरच्याच प्रतिक्रिया प्रत्येक पोस्टखाली वाचायला मिळत असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जनता कुणाला झुकते माप देईल आणि कुणाचे नशीब उजाडेल, यासाठी निकालाची प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.