बेळगाव लाईव्ह :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी सायंकाळी तसेच उद्या रविवार दि 28 एप्रिल रोजी दुपारपर्यंत शहराच्या आणि शहराकडे येणाऱ्या कांही मार्गावरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला असल्याची माहिती गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी सायंकाळी बागलकोट रोड व सुवर्ण विधानसौधपासून होनगापर्यंत राष्ट्रीय महामार्ग व दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर तसेच उद्या रविवारी होनगापासून सुवर्ण विधानसौधपर्यंत राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हिस रोडवरील वाहतुकीस व्यत्यय येणार आहे.
त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. तसेच कोल्हापूर निपाणीहून येणारी सर्व वाहने संकेश्वर, हुक्केरी मार्गे तर एम. के. हुबळी, धारवाडहून बेळगावकडे येणारी वाहने नेसरगी, भेंडीगेरी क्रॉस मार्गे वळविण्यात येणार आहेत. निपाणी, कोल्हापूर, यमकनमर्डीहून बेळगावकडे येणारी वाहने राम धाब्याजवळ उजव्या बाजूला वळवण्यात येतील. बागलकोटहून बेळगावकडे येणारी वाहतूक नेसरगी, गोकाक मार्गे वळविण्यात येणार आहे.
बागलकोट, रायचूर, येरगट्टी मार्गे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस कनकदास सर्कल, कणबर्गे, खणगाव, सुळेभावी, मारीहाळ पोलिस स्थानकाच्या क्रॉसपासून वळविण्यात येतील. बेळगाव शहरातून बी. एस. येडीयुराप्पा मार्गावरून अलारवाड ब्रिजकडे जाणाऱ्या वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावयाचा आहे.
या खेरीज आज शनिवारी सायंकाळपासून उद्या रविवारी 28 एप्रिल रोजी दुपारपर्यंत अवजड व मध्यम वाहनांना बेळगाव शहरात प्रवेश बंदी असून त्यांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करायचा आहे. पंतप्रधानांच्या जाहीर सभेसाठी येणाऱ्या वाहनांसाठी ज्योतीनगर, येडीयुराप्पा मार्ग परिसरातील बळ्ळारी नाला परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच निपाणी, अथणी, चिक्कोडी, रायबाग, कुडची, संकेश्वर, हुक्केरी परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी हलगा -मच्छे बायपास रोडवर पार्किंगची सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बैलहोंगल, बागेवाडी, रामदुर्ग, सौंदत्ती परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी अलारवाड जवळील सर्व्हिस रोडवर पश्चिमेला तर गोकाक, अरभावी, घटप्रभा येथून येणारी वाहने अलारवाड सर्व्हिस रोडवर पूर्वेला पार्क करावी लागतील.