बेळगाव लाईव्ह :चिक्कोडी मतदारांमध्ये महत्त्वाची घडामोड घडली असून अलीकडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यल्प मत फरकाने पराभूत झालेले राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तम पाटील यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना आपला पाठिंबा दिला आहे. तसेच प्रियांका यांच्यासाठी चिक्कोडी मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू केला आहे.
भाजपमुळे सत्तेपासून दूर राहावे लागल्याने सध्याच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने (एनसीपी) काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात एनसीपीने काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सीमा भागात एनसीपीने आपला प्रभाव ठेवला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील त्यांच्या नेत्यांचा प्रभाव या ठिकाणी कामी आला आहे.
त्यामुळे आता एनसीपीचा पाठिंबा मिळाल्यामुळे काँग्रेसची बाजू आणखी भक्कम झाली आहे. स्थानिक एनसीपी नेते उत्तम पाटील यांनी आपला पाठिंबा व्यक्त करण्याबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचार कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या समवेत एनसीपी नेते चिक्कोडी, निपाणी, कागवाड, अथणी, यमकनमर्डी आदी क्षेत्रांमध्ये काँग्रेस पक्षाच्यावतीने प्रचार कार्यात व्यस्त झाल्याचे पहावयास मिळत आहे.
एनसीपी नेते उत्तम पाटील यांनी यावेळी बोलताना पक्षाचे वरिष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेवरून लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. तसेच जातीयवादी भाजप सत्तेवर येणे अपायकारक आहे. यासाठी एनसीपी पक्षाने चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अन्नभाग्य, क्षीरभाग्य सारख्या जनहितार्थ योजना राबवून समस्त देशासमोर नवा आदर्श ठेवला आहे. माजी मुख्यमंत्री देवराज अरस आणि रामकृष्ण हेगडे यांच्या नंतर कर्नाटकातील ते सर्वोत्तम मुख्यमंत्री बनले आहेत.
काँग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष बनला आहे. तेंव्हा येत्या निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस पक्षाला त्यांचे बहुमूल्य मत घालून आशीर्वाद द्यावा. सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेली विकास कामे आणि पंच गॅरंटी योजनांमुळे मतदारांनी काँग्रेस पक्षालाच पाठिंबा द्यावा.
यापूर्वीच्या खासदारांनी चिक्कोडी मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी शून्य विकास झाला आहे. त्यामुळे भाजपला नाकारून या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने काँग्रेसला पाठिंबा द्यावा असे आवाहन उत्तम पाटील यांनी केले.