बेळगाव लाईव्ह : जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वृद्ध, दिव्यांग आणि अंध मतदारांची मते घेण्यासाठी गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला.
दोन दिवस ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. याबाबत महानगरपालिकेमध्ये सेक्टर अधिकारी, पीआरओ, एपीआरओ आणि कर्मचाऱ्यांना घरोघरी जावून मतदान घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये उत्तर व दक्षिण मतदारसंघातील मतदारासंदर्भात संपूर्ण माहिती देण्यात आली. वृद्ध, दिव्यांग व अंध मतदारांची मते घेण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.
यामध्ये सेक्टर अधिकाऱ्यांसह पीआरओ, एपीआरओ, कर्मचारी आणि पोलीस यांचा समावेश राहणार आहे. एका पथकाला 46 ते 52 मतदारांची मते घरी जावून घ्यावी लागणार आहेत.
गुरुवारी सकाळपासूनच या मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत घरोघरी जावून मतदान घेण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान घेताना घ्यावयाची काळजी, संपूर्ण अंध मतदार असेल तर त्याच्या घरातील एका व्यक्तीला घेऊनच मतदान करून घेण्याची सूचना देण्यात आली आहे.
कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची दक्षता घेण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे. मतदान घेतल्यानंतर त्याची संपूर्ण नोंद, मतपत्रिका बंद पेटीमध्ये संबंधितांकडूनच टाकून द्यायची आहे. याबाबत प्रत्येकानेच काळजी घ्यावी.
कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीचे काटेकोरपणे पालन करावे, असेही यावेळी सांगण्यात आले. या कार्यशाळेला महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांसह इतर विभागातील कर्मचारी आणि शिक्षक उपस्थित होते.