बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांना हद्दपार करण्याचा डाव कर्नाटक सरकारने आखला आहे. एकीकडे भाषा, संस्कृती आणि दुसरीकडे मराठी भाषिकांचे जीवन संकटात सापडले असून मराठी विरोधी सरकारला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी, आपली भाषा, संस्कृती, जमिनी टिकवून अस्तित्व सिद्ध करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या गळाला गेलेल्या मराठी भाषिकांनी मागे फिरून पुन्हा समितीच्या प्रवाहात समाविष्ट व्हावे, असे आवाहन समिती नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.
आज समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या रमाकांत कोंडुसकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन्ही राष्ट्रीय पक्ष शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. तेंव्हा या दोन्ही पक्षातील माझ्या मराठी शेतकरी बांधवांना कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही त्या पक्षात जाल तर स्वतःची मातृभाषा गमवून बसाल. आपल्याला आपली मातृभाषा आणि शेतकऱ्यांची शेती टिकवायची आहे. यासाठी तुम्ही मागे फिरा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवारी बैलगाडीतून जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी स्वतः बैलगाडी हाकत असताना रमाकांत कोंडुसकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते.
ते म्हणाले की, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील हे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनासाठी पैशांचे वाटप करून मोठमोठ्या गाड्यांमधून येऊन अर्ज दाखल केले. यावरून दिसून येतं की दोन्ही राष्ट्रीय पक्ष शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. लोकांना माता-भगिनींना वाटेल की आम्ही कमी संख्येने असून देखील आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवारी अर्ज का दाखल होतोय? मला त्यांना सांगायचे आहे की सामान्यातील सामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी, माझ्या शेतकरी बांधवांना बळ देण्यासाठी, मराठीतील फलक वाचवण्यासाठी, माझी मातृभाषा वाचवण्यासाठी स्वाभिमानाने आज असंख्य माता भगिनी तसेच युवा कार्यकर्ते समिती उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले आहेत. जनतेला मी एकच सांगू इच्छितो महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा कोणत्याही भाषेच्या विरोधात राज्याच्या विरोधात किंवा जातीच्या विरोधात नसून आपला हक्क मिळवण्यासाठीचा हा लढा आहे. गेली 67 वर्षे हा लढा असा सुरू आहे आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत तो सुरू राहील, असे कोंडुसकर यांनी सांगितले
जसं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण आहे की शिका, संघर्ष करा आणि आपला अधिकार मिळवा. संविधानामध्ये देखील डॉ. आंबेडकरांनी प्रत्येकाला आपला अधिकार मिळवण्याची सुविधा करून दिली आहे. तथापि कर्नाटक राज्य असेल किंवा केंद्र सरकार हे दोन्ही सरकार शेतकऱ्यांना धुळीस मिळवण्याचे काम करत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती गेली 67 वर्षे तन-मन-धनाने कार्य करत आहे. तेंव्हा दोन्ही राष्ट्रीय पक्षातील माझ्या मराठी शेतकरी बांधवांना कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही त्या पक्षात जाल तर स्वतःची मातृभाषा गमवून बसाल.
आपल्याला आपली मातृभाषा आणि शेतकऱ्यांची शेती टिकवायची आहे. यासाठी तुम्ही मागे फिरा, आपल्या मातृभाषेशी एकनिष्ठ रहा मातृभाषा टिकून आपल्याला आपल्या राज्यात जायचं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकाराच्या माध्यमातून कार्य करायचे आहे, असे रमाकांत कोंडुसकर शेवटी म्हणाले.