बेळगाव लाईव्ह :कारवार लोकसभा मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निरंजन सरदेसाई यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी कारवार येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत कारवार वासियांचे लक्ष वेधून घेतले.
अर्ज दाखल करण्यासाठी रवाना होण्यापुर्वी खानापूर येथील शिवस्मारक येथे तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच रामनगर येथेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यांनतर कारवार कोर्ट रोड
येथील छत्रपती शिवाजी सर्कल पासून रॅलीला सुरुवात करण्यात आली भगवे ध्वज आणि भगव्या टोप्या यामुळे रॅलीच्या वेळी भगवेमय वातावरण पाहावयास मिळत होते तसेच रॅलीच्या वेळी जय भवानी जय शिवाजीसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात आला.
यावेळी बोलताना तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी अर्ज भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झाले आहेत त्यामुळे निवडणुकीत समितीला चांगले यश मिळणार आहे. लवकरच गावागावात जाऊन प्रचाराला सुरुवात करणार आहोत. समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः उमेदवार समजून प्रचाराची धुरा सांभाळावी असे मत व्यक्त केले.
समिती नेते आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, बाळासाहेब शेलार, रणजीत पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी सीमा सत्याग्रही शंकर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयराम देसाई, म्हात्रू धबाले, रमेश धबाले, कृष्णा कुंभार, मारूती गुरव, मुकुंद पाटील, रणजित पाटील, रवींद्र शिंदे, सुधिर नावलकर, संदेश कोडचवाडकर, अशोक पाटील,
सरदेसाई यांचा अर्ज भरण्यासाठी खानापूर तालुक्याच्या विविध गावांतील कार्यकर्त्यांसह रामनगर भागातील कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच अर्ज भरून झाल्यानंतर या परिसरातील अनेक गावांना भेटी देऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले.