बेळगाव लाईव्ह :गणेशपुर भागातील एमईएस कॉलनीमधील श्री गणेश मंदिर परिसरातील अनेक झाडांची विकासाच्या नावाखाली कत्तल करण्यात आली असून याकडे हिंडलगा ग्रामपंचायत आणि वनखात्याने लक्ष देऊन संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी जागरूक नागरिकांमधून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील एमईएस कॉलनी मधील खुल्या जागेत कांही वर्षांपूर्वी कॉलनीतील दानशूर लोकांच्या सहभागातून लहानसे श्री गणेश मदिर उभारण्यात आले आहे.
सदर जागेचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याने लोकप्रतिनिधींच्या मदतीने निवडणुकीच्या तोंडावर सदर जागेच्या विकासाचा नारळ फोडण्यात आला. सदर मंदिर परिसराला आवार भिंतीसह आतमध्ये बसण्याचे बाक आणि उद्यान अशा संकल्पनेचा विकास आराखडा राबविण्याची तयारी सुरू असताना एका स्थानिक नागरिकाच्या हट्टी भूमिकेमुळे या ठिकाणी लावण्यात आलेली अनेक झाडे कोणाच्याही परवानगी विना बेकायदेशीररित्या तोडण्यात आली आहेत.
स्थानिक लोकांनी सुरुवातीच्या काळात लावलेल्या या झाडांची आज चांगली वाढ होऊन मोठ्या वृक्ष्यात रूपांतर झाले होते. मात्र एका व्यक्तीच्या हेकेखोर वृत्तीमुळे त्या ठिकाणची झाडे तोडण्यात आली असल्याचा आरोप आहे. जागेच्या आवारासाठी ही झाडे तोडण्याची खरं तर गरज नव्हती, सदर झाडे तशीच ठेवून आवार भिंत उभारता आली असती.
स्थानिकांचीही तशी मागणी असताना फक्त वैयक्तिक मोठेपणासाठी झाडांची बेकायदा कत्तल केल्याचे बोलले जात आहे. या संबंधी वन विभाग आणि हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष यांच्याकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली असून त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या प्रकारांनी तात्काळ योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.