बेळगाव लाईव्ह :मराठा समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणारे मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांच्या येत्या मंगळवार दि. 30 एप्रिल रोजी बेळगावमध्ये होणाऱ्या भव्य जाहीर सभेच्या पूर्वतयारीची आज शनिवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांची येत्या 30 एप्रिल रोजी बेळगावातील महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मैदानामध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पूर्वतयारीला प्रारंभ झाला असून मैदानाची स्वच्छता, सपाटीकरण वगैरे कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांची आज शनिवारी सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर, रणजित चव्हाण पाटील विकास कलघटगी, सागर पाटील व समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून आवश्यक सूचना केल्या.
यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा योद्धा मनोज जरांगे -पाटील यांची जाहीर सभा या ठिकाणी धर्मवीर संभाजी महाराज उद्यान महाद्वार रोड येथे आयोजित केली आहे. सभेची पूर्वतयारी करण्यात येत असून आज या ठिकाणी त्याची पाहणी करण्यात आली.
व्यासपीठ, एलईडी स्क्रीन कोठे उभारायचे, आसन व्यवस्था वगैरे बाबींवर यावेळी विचार विमर्श करण्यात आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका संघर्ष करा आणि आपला हक्क मिळवा या विचारधारेतून आम्ही मनोज जरांगे -पाटील यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले आहे.
ते आपल्या समाजाला संबोधित करणार आहेत. त्यासाठी बेळगाव आणि परिसरातील माझ्या समस्त मराठा समाज व मराठी भाषिक जनतेने या ठिकाणी जाहीर सभेला बहुसंख्येने वेळेवर उपस्थिती लावावी, असे आवाहन कोंडुसकर यांनी केले. महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी महाराज उद्यानामध्ये यापूर्वी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांच्या जाहीर सभा गाजल्या होत्या.
आता याच ऐतिहासिक धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मैदानावर मराठ्यांची मुलुख मैदान तोफ मनोज जरांगे -पाटील आपली तोफ डागणार आहेत. या सकल मराठा समाज आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मराठ्यांचे एकत्रीकरण आणि सीमा भागातील मराठी समाज व मराठी माणसांच्या न्याय हक्काला वाचा फोडणार आहेत.
दरम्यान धर्मवीर संभाजी उद्यानात सभा घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांच्या सहकार्याने समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी यांनी महापालिका आयुक्त लोकेश, पोलीस आयुक्त डीसीपी यांच्या गेल्या चार दिवसात भेटीगाठी घेत परवानगी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.