हर हर महादेव, घर घर महादेव!
समितीची उमेदवारी महादेव पाटील यांना
महादेव पाटील बेळगाव लोकसभेचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार!
बेळगाव लाईव्ह : २०२४ साली होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून महादेव पाटील यांच्यासह साधना सागर पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, आपटेकर आदींनी अर्ज भरले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या निवड कमिटीच्या झालेल्या बैठकीत इच्छुकांच्या मुलाखतीनंतर महादेव पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सदर निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तत्पूर्वी साधना पाटील आणि चंद्रकांत कोंडुसकर यांनी माघार घेतली. यामुळे महादेव पाटील आणि आपटेकर या दोघांसाठी निवड कमिटीने मतदान प्रक्रिया राबविली. या प्रक्रियेत महादेव पाटील यांना ३१ पैकी २६ मते मिळाली. तर आपटेकर यांना ५ मते मिळाली.
महाराष्ट्र किरण समितीच्या वतीने 32 जणांची निवड समिती स्थापन करण्यात आली होती बैठकीला हजर 31 निवड समितीच्या सदस्यांनी जेष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील यांना पसंती देत बेळगाव लोकसभेचा उमेदवार जाहीर केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा सामान्य कार्यकर्ता ते बेळगाव लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार असा महादेव पाटील यांचा प्रवास आहे.
एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देत म ए समितीने समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी माणसासाठी लढणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला देखील लोकसभेची उमेदवारी मिळू शकते आणि मराठीसाठी तो लढू शकतो झगडू शकतो हेच या निमित्ताने अधोरेखित झाले आहे.
यावेळी शहर म. ए. समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, ऍड. राजाभाउ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, विकास कलघटगी, ऍड. अमर येळ्ळूरकर, आर. आय. पाटील, चंद्रकांत कोंडुस्कर, साधना पाटील, आर. एम. चौगुले आदींसह निवड समिती सदस्य विविध मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.