बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील सरदार हायस्कूल मैदान म्हणजे अलीकडे मद्यपींचा अड्डा बनवू लागले असून पोलिसांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी मैदानावर खेळण्यास व व्यायामास येणारे नागरिक व क्रीडापटूंकडून केली जात आहे.
सरदार हायस्कूल मैदान हे बेळगाव शहरातील मोजक्या जुन्या मैदानांपैकी एक आहे. महापालिकेकडून या मैदानाचा चांगल्या प्रकारे विकास साधण्यात आला आहे. या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीची सोय करण्यात आली आहे.
वर्षभर विविध क्रीडा स्पर्धा आणि कार्यक्रमांसह प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केल्या जाणाऱ्या या मैदानाचा अलीकडे दुरुपयोग होत आहे. सायंकाळनंतर या ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दारुड्यांच्या मैफली जमू लागल्या आहेत.
कांही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागू झाल्यापासून शहरातील दारू दुकानांमध्ये दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी होत असल्यामुळे तळीरामांची अर्थात मद्यपींची मोठी कुचंबना होत आहे. दुकानात दारू प्यायला मिळत नसल्यामुळे दारुड्यांनी सध्या सरदार्स मैदानाला दारूचा अड्डा बनवल्याचे निदर्शनास येत आहे.
या ठिकाणच्या आडोशांचा गैरफायदा मद्यपी मंडळी घेत असून दररोज सकाळी मैदानाच्या कांही भागात दारू व बियरच्या बाटल्यांचा खच पडलेला पहावयास मिळत आहे. परिणामी सकाळी या ठिकाणी खेळण्यासाठी अथवा प्रशिक्षणासाठी येणाऱ्या क्रीडापटूंना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना क्रीडा प्रशिक्षक गणेश काळे यांनी सदर प्रकाराचा तीव्र निषेध केला. दारू पिणारी मंडळी दारूच्या रिकाम्या बाटल्या खाद्यपदार्थ मैदानातच टाकून जातात. बरेच जण दारूच्या बाटल्या फोडतात.
या फुटलेल्या बाटल्यामुळे सकाळी मैदानात खेळणाऱ्या अथवा व्यायाम करणाऱ्यांना इजा होऊ शकते, असे सांगून त्यांनी सदर प्रकाराचा तात्काळ बंदोबस्त केला जावा अशी काळे यांनी मागणी केली. तसेच पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सदर मैदानाचा सदुपयोग करणारे नागरिक आणि क्रीडापटू करत आहेत.