बेळगाव लाईव्ह :श्रीमंत छत्रपती श्री शाहू महाराज (कोल्हापूर) आणि महाविकास आघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे बेळगाव लोकसभेचे उमेदवार महादेव पाटील आणि कारवार लोकसभेचे उमेदवार निरंजन सरदेसाई या दोघांना आशीर्वाद दिले आहेत.
मंगळवारी सकाळी कोल्हापूर मुक्कामी समिती उमेदवारांनी श्रीमंत शाहू महाराजांची भेट घेत आशीर्वाद मिळवला.कोल्हापूर आणि बेळगावचे संबंध नेहमीच मधुर राहिलेले आहेत बेळगावला ज्या ज्या वेळी एखादी घटना घडते त्याचे ताबडतोब पडसाद कोल्हापुरात उमटतात. छ्त्रपती शिवाजी महाराजांची गादी असलेले कोल्हापूर नेहमीच बेळगावच्या जनतेच्या पाठीशी उभे राहते.
तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय या प्रमाणे कोल्हापूर बेळगावचे नाते संबंध मोठ्या प्रमाणात आहेत अनेक मुली तिकडे दिल्या आहेत अनेक मुलींची सासर बेळगाव आहे .त्यामुळे बेळगाव आणि कोल्हापूर ऋणानुबंध घट्ट आहेत.
बेळगाव जिल्ह्यातच छत्रपतींची संपत्ती अनेक ठिकाणी आहे.त्याच बेळगावा मधील मराठा इन्फंट्री रेजिमेंट मध्ये छत्रपतींना विशेष मान आहे इतकेच काय तर छ्त्रपती प्रिंटिंग प्रेस यासाठीही शाहू महाराजांनी भरीव मदत केली होती. पुरोगामी विचार सरणीचा कोल्हापूरचा वारसा बेळगाव कराना कोल्हापुरातूनच लाभला आहे. यापूर्वी बेळगावच्या भाई दाजीबा देसाई यांना कोल्हापूरकरानी निवडून दिले होते. बेळगावातील अनेक साहित्यिकांचे शिक्षण कोल्हापुरात झाले होते. जेष्ठ पत्रकार कै अशोक याळगी यांना आंदोलनात सहभाग घेतला म्हणून कॉलेज मधून काढून टाकले असताना कोल्हापूरच्या गोखले कॉलेज मधून त्यांनी शिक्षण घेतले. चंबा मुत्नाळ सारखे पैलवान कोल्हापूरच्या लाल मातीत मोतीबाग येथे सराव करत होते.
टोपन्ना गोजगे यांनी सतपाल वर विजय मिळवला त्यावेळी कोल्हापूरकरानी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. हरिश्चंद्र बिराजदार आणि सतपाल यांच्यातील बेळगाव येथे झालेल्या कुस्तीची स्मृती कोल्हापूर आणि बेळगाव मधील क्रीडा प्रेमींनी अजून जपून ठेवली आहे. अश्या कोल्हापूर आणि बेळगावच्या सांस्कृतिक सरमिसळ झालेल्या नात्याला उजाळा देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला आहे.
छत्रपतींच्या आशीर्वादाने मैदानात उतरलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये विजयाला गवसणी घालतील यात शंका नाही.
श्रीमंत शाहू महाराज सध्या लोकसभेसाठी कोल्हापूर मतदार संघातून महाविकास आघाडी मधून लढत असताना बेळगाव मधील उमेदवारांना पाठिंबा देणे म्हणजे सीमा प्रश्नासाठी उचललेले एक पुढचे पाऊल आहे.
यावेळी शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, मध्यवर्ती समितीचे सदस्य विकास कलगटगी, खानापूर समितीचे गोपाळराव देसाई आबासाहेब दळवी आदी उपस्थित होते.