बेळगाव लाईव्ह:लोकसभा निवडणुकीत बेळगावच्या बरोबरीनेच कारवार मतदारसंघासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने उमेदवार देणे म्हणजे इतिहासाच्या काळया पानांवर उमटवलेली एक पांढरी रेघ असेच म्हणता येईल. कारवार मतदारसंघात खानापूर जोडून इतकी वर्षे झालेला अन्याय दूर करण्यासाठी उचलले गेलेले एक पाऊल म्हणून या निर्णयाकडे बघता येईल.
लोकसभेला सर्वांना स्वातंत्र्य असे म्हणायचे आणि वरच्यावर पैसे लाटायचे हे कारभार आता करता येणार नाहीत. कारण कारवारच्या गडावरून लोकसभेला हादरे देण्यासाठी खानापूर समितीचा वाघ आता सज्ज झालाय.
खानापूर तालुक्याचे माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांचे पुतणे असलेल्या निरंजन सरदेसाई यांच्या रूपाने खानापूर तालुक्यातील मराठी जनतेला आपला आवाज थेट लोकसभेत पोहचविण्याची संधी मिळाली आहे.
मराठी असूनही मराठीपण जगू न देणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना खरी जागा दाखवून देण्याची एक संधीच आली आहे. मलप्रभेच्या काठावरून वाहणारे पाणी तोंडातून पळवून नेणाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवून लावण्याची हीच संधी आहे.
निरंजन सरदेसाई एक युवा उमेदवार म्हणून लाभले आहेत. त्यांची नाळ आपल्या मातीशी जुळलेली आहे. उच्चशिक्षित असूनही नोकरीच्या नावाखाली आपले गाव त्यांनी सोडलेले नाही. आपल्या भागात राहून आपल्या माणसांसाठी काम करण्याचा वसा या युवकाने उचलला आहे. चेहरा स्वच्छ आहे आणि काम करण्याची उमेद आहे.
सीमाप्रश्न संपला आता कर्नाटक काय सांगतोय ते निमूट ऐका असे सांगणारी ही अवलाद नाही. मराठी अस्मितेसाठी झटणारे वाघाचे काळीज असेच या उमेदवाराबाबत म्हणावे लागेल. बराच विरोध आणि सुरुवातीपासून येणारा दबाव झुगारून देऊन निरंजन खरे सरदेसाई ठरले आहेत. नकाराला होकारात बदलण्याची ताकद त्यांच्यात आहे. आता हे मनगट तितक्याच ताकदीने विरोधकांना ठोसे लावण्यासाठी सज्ज झाले असून खानापूर तालुक्यातल्या अस्मिता जपणाऱ्या माणसानं हे लक्षात घ्यायलाच लागणार आहे.
आजवर खानापूर तालुक्यातील अनेकजण लोकप्रतिनिधी झाले. मात्र तालुक्याला विकासाच्या वाटेवर नेण्यापेक्षा मते मिळवायची आणि नंतर पाठ फिरवायची हे झाले आहे. आजवर या परिसरात अनेक जण राजकारणी म्हणून घडले…. काही निवडणुकीत पडले तर अनेक आमदार म्हणून घडले…. पण तालुक्याला काय हवे आहे याची जाण ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळाला नाही. अत्यावश्यक अशा अनेक गोष्टी मिळाल्याच नाहीत. गावा गावांना जोडणारे रस्ते अजून व्हायचे आहेत. जुन्या साकवांना नव्या पुलांचे कोंदण हवे आहे. कस्तूरी रंगन सारख्या अहवालाने संकटात आलेले ग्रामवास्तव्य असो नाहीतर उच्च शिक्षणाच्या दर्जेदार सोयीविना विद्यार्थ्यांच्या पदरी आलेली पायपीट असो, भर पावसात शेतात राबून सुगीची वाट बघणाऱ्या बळी राजासमोरची विविध आव्हाने असोत….या साऱ्यांना आपल्या भावनेतून फुंकर घालणारा भूमिपुत्र लोकप्रतिनिधी आज प्रकर्षाने गरजेचा वाटतो.
खासदारकीची निवडणूक आली आणि अनेक उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी एक धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून आज निरंजन सरदेसाई आपलेसे वाटतात.राष्ट्रीय पक्षांनी नेहमीच कारवार लोकसभेसाठी उमेदवार देताना खानापुरच्या कार्यकर्त्यांवर अन्यायच केला आहे. आजच्या निवडणुकीतही हीच स्थिती आहे. काँग्रेसने ज्यांना उमेदवारी दिली त्या बाहेरच्या म्हणून नाकारल्या गेल्या आहेत. भाजपने जातीचे गणित खेळत बहुसंख्य मराठी आणि मराठा समाजावर अन्याय केला आहे. त्यांना फक्त मते हवी आहेत. चड्डीतल्या कार्यकर्त्याला चड्डीत च ठेवण्याची त्यांची प्रवृत्ती दिसून आली आहे. गरज आहे या साऱ्याविरुद्ध पेटून उटण्याची.
कारवार लोकसभा मतदारसंघात मराठीची शक्ती दाखवायची असेल तर सर्व प्रकारच्या मतभेदांना दूर ठेऊन मराठी म्हणून एकत्र यावे लागेल. तरच खानापुरचा वाघ लोकसभेत आपला प्रश्न पोहोचवू शकेल. खानापुरची जनता या आव्हानात कमी पडणार नाही, याची खात्री वाटते.
प्रसाद सु. प्रभू( जेष्ठ पत्रकार बेळगाव)