बेळगाव लाईव्ह : संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणामुळे चर्चेतील चेहरा असलेल्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बेळगाव 30 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. हि सभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आयोजिण्यात आली नाही.
परंतु मराठा आरक्षणाच्या माध्यमातून बेळगावमधील मराठा आणि मराठी भाषिक एकत्रित यावा, तसेच सीमाभागातील समस्याच या सभेच्या माध्यमातून दिल्ली दरबारी पोहोचाव्यात, सीमावासियांचा जरांगे पाटलांना पाठिंबा दर्शवावा या उद्देशाने हि सभा आयोजिण्यात आली आहे. मात्र हि सभा मराठी भाषिकांसाठी टर्निंग पॉईंट ठरणार का असा मुद्दा चर्चेला आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी रान पेटविले आहे. मराठा समाजाच्या हक्कांसाठी संपूर्ण समाज एकवटण्याची किमया त्यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची भूमिका निर्णायक अशी ठरणार आहे.
असा दिग्गज नेता बेळगावात मराठा समाजाला आणि मराठी भाषिकांना मार्गदर्शनासाठी येणार असल्याने मराठी भाषिक मोठ्या प्रमाणात एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरु आहे.
2016 साली झालेल्या मराठा क्रांती मोर्चा नंतर सीमा भागातील मराठा समाज एकवटू लागला असून त्याची धास्ती राष्ट्रीय पक्षांना दिसून येत आहे. सीमा भागात असलेला मराठा समाज महाराष्ट्र एकीकरण समितीचा कणा आहे याशिवाय हा समाज दोन्ही राष्ट्रीय पक्षातही विखुरलेला आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समिती वगळता दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडून या समाजावर नेहमीच अन्याय झालेला आहे.
राष्ट्रीय पक्षांनी मराठा समाजाचा वापर केला. गेल्या दहा वर्षात अपवादानेच मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. कामाला मराठा आणि पदाला अन्य असे स्थिती राष्ट्रीय पक्षात दिसून येते. त्यामुळेच राष्ट्रीय पक्षातील मराठा समाजात खदखद दिसून येत आहे. मराठा समाजाची होत असलेली प्रत्येक क्षेत्रातील पीछेहाट मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे बाजूला सरेल आणि मराठा समाजाला पुन्हा नव्याने संधी मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उभं केलेल्या आंदोलनात महाराष्ट्रातील लाखो मराठा समाजातील नागरिक एकत्र आले आहेत. बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेली सभा हि जरी निवडणुकीसाठी आयोजिण्यात आली नसली तरी या सभेत प्रत्येक मराठा आणि मराठी भाषिकाने उपस्थिती दर्शवून स्थानिक पातळीवर होणारे मराठी भाषिकांवरील अन्याय, मराठी भाषेवरील अन्याय आणि मराठीवर होणारे अत्याचार याला वाचा फोडावी. मनोज जरांगे पाटील यांचा आवाका पाहता खुद्द पंतप्रधानांनादेखील या आंदोलनाची दखल घ्यावी लागली आहे. याच मुद्द्याला अनुसरून सीमावासीयांनीदेखील या सभेच्या माध्यमातून आपल्या भावना राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.