बेळगाव लाईव्ह :कॅम्प येथील असदखां दर्गामागे फाटक्या कपड्यात फिरणाऱ्या एका मनोरुग्ण बेघर व्यक्तीच्या मदतीला धावून जात सेवा फाउंडेशन कॅम्प आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी त्याला बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज बुधवारी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, कॅम्प येथील असदखां दर्गामागे एक व्यक्ती फाटक्या कपड्यांसह रस्त्यावर फिरत असताना आढळून आला. तेंव्हा सेवा फाऊंडेशन आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या (एफएफसी) सदस्य सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला गाठून त्याची विचारपूस केली. त्यानंतर त्याला आंघोळ घालून नवीन कपडे घातले.
त्याचप्रमाणे 108 रुग्णवाहिका मागून त्या मनोरुग्ण व्यक्तीला बिम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रसंगी सेवा फाउंडेशनचे अकीब बेपारी आणि त्यांचे सहकारी तसेच एफएफसीचे संतोष दरेकर, अवधूत तुडवेकर आणि दिनेश कोल्हापुरे उपस्थित आहेत.
या सर्वांनी रुग्णाला दाखल करून घेण्यास मदत करणारे बीम्स इमर्जन्सी वॉर्डचे डॉ. विजयकुमार पाटील यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे असे मनोरुग्ण अथवा बेघर लोक आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा.
कारण एखाद्या वेळी ती हरवलेली व्यक्ती देखील असू शकते, असे आवाहनही बेळगाववासियांना केले आहे.