बेळगाव लाईव्ह :साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा सण उद्या मंगळवारी 9 एप्रिल रोजी साजरा होत असून त्यासाठी शहरातील बाजारपेठ सज्ज झाली आहे. सध्या पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात खरेदीची धामधूम दिसून येत आहे.
गुढीपाडव्याला सोने-चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन तसेच गृह खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य खरेदी करणे शुभ मानले जाते. नववर्षातील हा पहिलाच सण असल्याने या दिवशी सोने व वाहन खरेदीसह वास्तु प्रवेश करण्याचीही परंपरा असून त्या अनुषंगाने शहरात लगबग पहावयास मिळत आहे.
गुढीपाडवा उंबरठ्यावर आल्याने बाजारपेठेत नवीन वस्तू खरेदीसाठी उधान आले आहे. त्याचप्रमाणे गुढी उभारण्यासाठी आवश्यक चिव्याची काठी, साखरेच्या माळा, फळे, चाफ्याच्या फुलांची माळ, कलश, मिनी गुढीसह अन्य वस्तू बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
गुढी उभी करताना साडी भरजरी ब्लाऊज पीस चा वापर करतात. गुढीला साडी नेसवताना महिलांना बराच वेळ खर्च करावा लागतो. त्यांचीही अडचण दूर करत यंदा विक्रेत्यांनी गुढीची तयार साडी बाजारात आणली आहे.
गुढीला शोभणारी ही डिझायनर साडी पैठणी भरजरी काठाची सुंदर नक्षीकामात बनवली आहे. एकंदर गुढीपूजनाच्या साहित्य खरेदीसह सोने -चांदी, वाहन व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी काल रविवारी सायंकाळपासून शहरातील बाजारपेठ ग्राहकांनी फुलून गेलेली पहावयास मिळत आहे.