बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीने अधिकृत उमेदवाराचे नाव निश्चित केल्यानंतर पुढील रणनीती आखण्यासाठी आज मराठा मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते.
बेळगाव लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार महादेव पाटील यांचा अर्ज भरण्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत प्रत्येकाने सहकार्याची भूमिका घेऊन निवडणूक पार पाडावी, असा सल्ला उपस्थितांनी दिला.
यावेळी बोलताना मदन बामणे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते उमेदवारी अर्ज सादर करेपर्यंत समितीतील ज्येष्ठ आणि तज्ज्ञ वकिलांच्या सल्ला घ्यावा, आचारसंहितेतील तरतुदींचा बारकाईने अभ्यास करावा, राष्ट्रीय पक्षांना कुठेही चुका मिळू नयेत अशापद्धतीने खबरदारीच्या काम करावे, योग्य नियोजन करून प्रत्येकाने जबाबदारीने कामे वाटून घ्यावीत, अशा सूचना दिल्या.
शुक्रवारी उचगाव येथील श्री मळेकरणी देवीच्या प्रांगणात समिती उमेदवार महादेव पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असून यावेळी मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, राष्ट्रीय पक्षांचे मराठीविरोधी धोरण मोडीत काढावे आणि मराठी भाषिकांनी संयुक्तिक रित्या काम करावे असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक गुणवंत पाटील यांनी केले.
यावेळी अनेक समिती कार्यकर्त्यांनी सल्ला आणि सूचना दिल्या. या बैठकीला समिती नेते रमाकांत कोंडुसकर, आर. एम. चौगुले, शहर समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, समितीचे उमेदवार महादेव पाटील, ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आम. मनोहर किणेकर, समिती नेते प्रकाश मरगाळे, ऍड. अमर येळ्ळूरकर, अंकुश केसरकर, गुणवंत पाटील, सागर पाटील आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.