बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी केंद्रनिहाय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचे (ईव्हीएम) विलगीकरण/वाटप करण्याचा निर्णय आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घेण्यात आला.
मतदान यंत्र वाटपाची प्रक्रिया विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.२३) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सर्वसाधारण निरीक्षक व खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली.
या प्रक्रियेचा पहिला टप्पा आधीच पूर्ण झाला असून सदर मतदान यंत्रे लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूममध्ये पाठविण्यात आल्या आहेत. दुसऱ्या टप्प्याद्वारे, मतदान केंद्रांवर पाठवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) वर्गवारी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले की, मतदान यंत्रे वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यात निश्चित करण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत संबंधित मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी पाठवली जातील.
130 टक्के कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट दुसऱ्या टप्प्यातील यंत्रांमध्ये अंतिम केले जातील. 100 टक्के मतदान यंत्रे मतदान केंद्रांवर पाठवली जातात तर उर्वरित 30 टक्के अतिरिक्त मतदान यंत्रे राखीव असतील. मतदान केंद्रांवर पाठवलेल्या मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड असल्यास आरक्षित मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे मतदान 25, 26 आणि 27 रोजी घरोघरी जाऊन घेतले जाणार आहे. ८५ वर्षांवरील ज्या मतदारांनी आगाऊ कळविले आहे, त्यांच्याकडून विहित फॉर्म भरून मते जमा केली जातील. घरोघरी जाऊन प्रचार करताना राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. मात्र संबंधित पक्षांनी किंवा उमेदवारांनी एजंट नेमून त्यांना अगोदर कळवावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
सामान्य निरीक्षक एम.के.अरविंद कुमार, पोलीस निरीक्षक पवन कुमार, खर्च निरीक्षक हरकृपाल खटाना आणि नरसिंगराव बी., पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग, डीसीपी रोहन जगदीश, प्रोबेशनरी आय.ए.एस. अधिकारी शुभम शुक्ला आदींसह सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि नोडल अधिकारी सहभागी झाले होते.