बेळगाव लाईव्ह : शहर परिसरात शुक्रवारी वळिवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणच्या रस्त्यावरून गटारी भरून पाणी वाहात आहे.
बेळगावमधील बी. एस. येडियुरप्पा मार्गावर देखील गटारीचे पाणी वाहात असून सातत्याने दुरुस्ती करूनही या मार्गाची परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्याच वळीवाने केली स्मार्ट सिटीच्या कामाची ‘पोलखोल’!
ड्रेनेज, गटारीच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली; नागरिकांना मनस्ताप
बेळगाव शहरात आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने हजेरी लावली आणि उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला. ही सुखद बाब असली तरी जवळपास तासभर जोरदार हजेरी लावलेल्या या पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या विकास कामांची पुन्हा एकदा ‘पोलखोल’ केली. ड्रेनेज, गटारांचे पाणी रस्त्यावर येण्याद्वारे स्मार्ट सिटीच्या अवैज्ञानिक विकास कामांचा फटका बसल्याने शहरवासीयात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बेळगाव शहर उपनगरात आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास वळीव पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. जवळपास तासभर पडलेल्या या पावसामुळे सायंकाळी उशिरापर्यंत हवेत गारवा राहिला होता. त्यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना दिलासा मिळाला. तथापि जोराची हजेरी लावलेल्या या पावसाने बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शहर आणि उपनगरातील विशेष करून गटारी व रस्त्यांच्या विकास कामांचे पितळ पुन्हा एकदा उघडे पाडले. पावसामुळे जुन्या पी. बी. रोड येथील ओव्हर ब्रिजच्या खालील रस्ता आज ड्रेनेज व गटार तुंबून पुन्हा पाण्याखाली गेलेला पहावयास मिळाला. परिणामी या संपूर्णपणे दूषित काळ्याशार दुर्गंधीयुक्त पाण्याखाली गेलेल्या या रस्त्यावरून कसरत करत ये -जा करणारे वाहन चालक आणि पादचारी प्रशासनाला लाखोल्या वाहताना पहावयास मिळाले. जुन्या पी. बी. रोड रेल्वे फाटकाच्या ठिकाणी ओव्हर ब्रिजची निर्मिती झाल्यापासून निर्माण झालेली ही समस्या आजतागायत तशीच आहे. परिणामी गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात रस्त्यावरील सांडपाणी शेजारील घरे, दुकाने, वर्कशॉपमध्ये शिरत असल्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत वारंवार तक्रार करून देखील आजतागायत स्मार्ट सिटी आणि महापालिका प्रशासन निद्रिस्त आहे. आता पहिल्याच वळीव पावसात ही अवस्था झाल्यामुळे येथील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरात बऱ्याच ठिकाणी आज पावसामुळे गटारी व ड्रेनेज तुंबून सांडपाणी पाणी रस्त्यावर येण्याद्वारे स्मार्ट सिटीची ऐसी की तैसी झाल्याचे पहावयास मिळाले. सदोष गटार व्यवस्थेमुळे आज भोई गल्ली, पांगुळ गल्ली, भेंडी बाजार या शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. हीच अवस्था उद्यमबाग येथील बेळगाव -खानापूर रोडची झाली होती. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक खबरदारीस घेतली नसल्यामुळे हा रस्ता मोठ्या अंतरापर्यंत पाण्याखाली गेला होता. त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना संथ गतीने वाहने हाकावे लागत होती. आजच्या पावसामुळे विकास कामे व्यवस्थित पूर्ण न केलेल्या ठिकाणी सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरलेले पहावयास मिळत होते त्याचप्रमाणे उपनगरातील अंतर्गत भागातील रस्त्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वत्र रस्त्यावर ठिकठिकाणी गढूळ पाण्याची तळी साचलेली पहावयास मिळाली. आजच्या पहिल्याच वळीव पावसामुळे शहरातील रस्ते, गटारींची झालेली एकंदर दुर्दशा पाहता बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडला केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार कोणत्या निकषावर दिले जातात? असा प्रश्न संतप्त शहरवासीयांना पडू लागला आहे.