बेळगाव लाईव्ह: भारत हा देश प्रजासत्ताक आहे लोकशाही अद्याप देशात अस्तित्वात आहे असे असताना सर्वांना समान न्याय देण्याची गरज आहे मात्र बेळगाव शहरात निवडणूक आचारसंहिता लागू करताना दुजाभाव होत आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणचे भगव्यासह अन्य ध्वज व पताका उतरवण्यात येत असल्या तरी यातून लाल पिवळ्या ध्वजांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे लाल पिवळ्या ध्वजाला भारतीय निवडणूक आयोगाची निवडणूक आचारसंहिता लागू नाही का? असा सवाल जागरूक नागरिकांत उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासनाकडून शहरातील भगवे ध्वज व भगव्या पताका तसेच अन्य जाती धर्माचे ध्वज युद्धपातळीवर काढून टाकले जात आहेत. मात्र ही कारवाई करत असताना जाणीवपूर्वक लाल पिवळ्या ध्वजांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून येत आहे.
गोवावेस येथील बेळगाव खानापूर रोड हा दुपदरी रस्त्याच्या दुभाजकावरील पथदीप हे त्याचे एक उदाहरण आहे. आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू होऊन आता आठवडा होत आला तरी या ठिकाणच्या पथदिपांच्या खांबावरील लाल पिवळे ध्वज अद्यापही फडकत आहेत.
या पद्धतीने खुद्द प्रशासनाकडूनच भारतीय निवडणूक आयोगाने तयार केलेल्या आदर्श निवडणूक आचारसंहितेची खिल्ली उडवली जात असल्याने जागरूक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून फक्त लाल पिवळ्याला अभय का? असा सवाल केला जात आहे.